शिरूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांना अखेर येथील विशेष मुलींच्या संस्थेतील ‘देवदूतांची’ दया आली. ‘लोकमत’ने उमाप यांनी संस्थेला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिल्यानंतर उमाप यांनी त्याची दखल घेऊन उर्वरित अनुदान देण्याचे आदेश दिले. हे अनुदान संस्थेच्या खात्यावर जमा झाले.येथील शासकीय विशेष मुलींची संस्था ‘कर्मोलोदया’ या संस्थेद्वारे चालविली जात आहे. १ डिसेंबर २०१५ रोजी उमाप यांनी अचानक या संस्थेला भेट दिली होती. ‘विशेष’ मुलींची संस्था असूनही मुलींचे नीटनेटकेपणाने होणारे संगोपन तसेच संस्थेतील स्वच्छता व एकूणच सकारात्मक वातावरण पाहून उमाप भारावून गेले होते. कर्मोलोदयाच्या अधीक्षिका, सिस्टर्स व इतर कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना उमाप यांनी त्यांना देवदूत म्हणून संबोधले होते. काही समस्या असल्यास थेट संपर्क साधा, समस्या त्वरित सोडवली जाईल, असे त्यांना आश्वस्त केले होते. थकीत अनुदानाबाबत डिसेंबर महिन्यापूर्वी अधीक्षिका सुमा, सिस्टर सुना यांनी उमाप यांची जिल्हा परिषदेत भेट घेतली होती. त्या वेळी उमाप यांनी दखल घेतल्याने ६० टक्के रक्कम संस्थेला प्राप्त झाली होती. संस्थेत भेटीच्या वेळी सुमार यांनी याचा ऊहापोह करताना उर्वरित ४० टक्के अनुदान लवकर मिळावे, अशी विनंती उमाप यांना केली होती. यावर दोन ते तीन दिवसांत उर्वरित अनुदान देण्यास सांगतो, असे आश्वासन उमाप यांनी संस्थेला दिले होते. (वार्ताहर)
अखेर ‘कर्मोलोदया’च्या खात्यात अनुदान जमा
By admin | Published: March 10, 2016 12:58 AM