केंदूर : पिंपळे जगताप चौफुला (ता. शिरूर) येथील चाकण- शिक्रापूर रस्त्यावरील अज्ञात वाहनाच्या धडकेत १२ वर्षांच्या नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला. मात्र, वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या हलगर्जीपणामुळे या जखमी बिबट्याला लवकर उपचारच मिळाले नसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडली.सोमवारी पहाटे बिबट्यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्या वेळी बिबट्या मोठमोठ्याने ओरडतही असल्याचे नागरिकांना पाहिले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या वेळी रस्त्याच्या कडेला बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमू लागली व वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान, या भागात बिबट्या असल्याची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत माने, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस नाईक संदीप जगदाळे, हेमंत इनामे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूककोंडी व नागरिकांची गर्दी आटोक्यात आणली.या वेळी हा बिबट्या जिवंत होता व डरकाळ्या फोडत तेथून पळण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु, जखमी झाल्यामुळे त्याला चालणे शक्य होत नव्हते. त्यांनतर काही वेळाने वन विभागाचे कर्मचारी वनरक्षक सोनल राठोड, वनपरिमंडल अधिकारी बबन गायकवाड, वनमजूर आनंदा हरगुडे, वन विभाग सर्पमित्र गणेश टिळेकर या ठिकाणी आले. मात्र, वनाधिकाºयाकडे कोणतेच साहित्य अधवा उपचारांसाठी काहीच उपाय नसल्याने त्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली.या वेळी बिबट्याची चाललेली धडपड पाहूनदेखील वनाधिकारी ‘आमची दुसरी टीम जुन्नर या ठिकाणाहून येत असल्याचे’ सांगत होते. त्यांनतरदेखील काही तास कोणीच आले नाही. त्यामुळे जखमी बिबट्याला उपचार मिळाले नाहीत. यामुळे त्याचा काही वेळाने मृत्यू झाला.त्यांनतर काही वेळाने वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे, नियमक्षेत्र अधिकारी प्रवीण क्षीरसागर, बी. एस. शिंदे त्या ठिकाणी आले. परंतु, बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची खात्री झाली असूनदेखील बिबट्याचा मृतदेह त्यांनी तसाच ठेवला.नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यांनतरदेखील वन विभागाचे अधिकारी जुन्नरहून निघालेले पथक येण्याची वाट पाहत होते; परंतु स्थानिक नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्यामुळे वन विभागाने मृत बिबट्याला खासगी वाहनातून जुन्नर येथे नेण्यात आले.
अखेर ‘त्याची’ डरकाळी संपली!, जखमी बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 6:45 AM