उच्चदाब वाहिनी स्थलांतराचा वाद : नागरिकांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर परिसरातील ‘ॲमनोरा’ संकुल परिसरात, उच्चदाब वीज वाहिनीसाठी धोकादायक पद्धतीने केलेले बांधकाम अखेर बुधवारी कंपनीनेच जनतेच्या दबावामुळे काढून टाकले. परिसरातील नागरिकांनी याबाबतची मागणी केली होती. ‘लोकमत’ने त्याचा पाठपुरावा केला होता.
हडपसर परिसरातील ग्रामस्थ, अमोल तुपे, राहुल तुपे, संतोष ठाणगे यांनी याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या, पुणे प्रकल्प मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना महिन्यांपूर्वी दिले होते. त्याबाबतचे वृत्त ८ जुलैच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते.
हडपसर परिसरातील साडेसतरा नळी भागातील, पाईपलाईन रस्त्याच्यामधून १३२ केव्ही क्षमतेच्या उच्च दाब वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. जुनी लाईन ही शेतजमिनीतून जात असल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना धोका पोहोचत नव्हता. मात्र, वाहिनीच्या प्रस्तावित स्थलांतरामुळे भविष्यात, या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. ॲमनोरा पार्क टाऊनशिपमध्ये बिल्डरला बांधकाम करावयाचे असल्याने कंपनीने वीजमंडळाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने हे काम होत आहे. त्यामुळे सुरक्षेची पायमल्ली होत असल्याची तक्रार त्यांनी या निवेदनाद्वारे केली होती. हे काम तातडीने न थांबवल्यास ग्रामस्थांना तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला होता.
चौकट
सुरक्षाविषयक नियमाला हरताळ
उच्च दाब वीजवाहिनीसाठी, बांधण्यात येणारा मोनोपोल हा दोन किंवा जास्त रस्ते एकत्र येतात, त्याठिकाणी नसावा, असा नियम आहे. मात्र, ‘ॲमनोरा टाऊनशिप’ विकसित करणाऱ्या ‘सिटी कार्पोरेशन’ या कंपनीने त्याकडे पूर्णत: काणाडोळा करीत मोनोपोल उभारणीसाठी भर चौकातच फाउंडेशनचे बांधकाम केले होते. जनतेच्या रेट्यामुळे ते बांधकाम बुधवारी (ता.१२) सकाळी कंपनीनेच काढले. या कारवाईनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त करतानाच उर्वरीत स्थलांतराचे काम सार्वजनिक रस्त्यावर न करता कंपनीच्या मालकीच्या जागेतून करावे, अशी मागणी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे केली. या कारवाईबाबत ‘ॲमनोरा’चे प्रवर्तक अनिरुद्ध देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
फोटो ओळ:
‘ॲमनोरा’ परिसरातील, सार्वजनिक पाईपलाईन रस्त्यावर वीजवाहिनीसाठी केलेले धोकादायक बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले.