जितो या सेवाभावी संस्थेच्या वतीने गतवर्षी कोरोना रुग्णांच्या शुश्रुषेसाठी कोविड केअर सेंटर ठिकठिकाणी सुरू करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा उचल खाल्ल्यानंतर आता पुन्हा ʻजितोʼने सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कॉलनीतील स्पॅन एक्झेक्युटीव या हॉटेलमध्ये रविवारपासुन सेंटर सुरू करण्याची तयारी सुरू होती. मात्र, शनिवारी दुपारी अचानक काही रहिवाशांकडून विरोध सुरू झाल्याने याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर, रविवारी सकाळी जितोचे पदाधिकारी ओमप्रकाश रांका, विजय भंडारी, लखीचंद खिवंसरा, कांतीलाल ओसवाल, मनोज छाजेड, आदेश खिवंसरा, पंकज कर्नावट आदींनी नगरसेविका ज्योत्स्नाताई एकबोटे, डॉ. सुकुमार सरदेशमुख यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करीत त्यांच्या प्रत्येक शंकेचे समाधान केले. त्यानंतर कॉलनीतील रहिवाशांची स्वतंत्र बैठक झाली आणि काही मिनिटांतच विरोध मावळत बहुसंख्य सदस्यांनी सक्रिय मदत करण्याचा निर्णय एकमताने जाहीर केला.
त्यानंतर, सायंकाळी साडेचार वाजता महापौर मोहोळ, ज्योत्स्नाताई एकबोटे, ॲड. एस. के. जैन, ॲड. अभय छाजेड आणि जितो पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सेंटरचे उद्घाटन पार पडले.
यावेळी, मोहोळ म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात जैन समाजाने केलाल्या कार्याची इतिहासात दखल घेतली जाईल. महापालिका आवश्यक ती सर्व मदत करेल.ʼ तर ॲड. जैन म्हणाले, रहिवाशांचे असे सहकार्य मिळत गेल्यास कोरोनाला अटकाव करण्यास मोठी मदत होईल. ज्योत्स्ना एकबोटे, यांनी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तर अभय छाजेड यांनी, शहरातील ऑक्सिजन कमतरतेबाबत एकजुटीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
यावेळी, राजेश सांकला, ओमप्रकाश रांका, अचल जैन आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला, डॉ. गजानन एकबोटे, विजयकांत कोठारी,डॉ. संचेती दांपत्य, विक्रम गौड, सुहास बोरा, इंदर जैन, राजेंद्र बांठीया, इंदर छाजेड आदी उपस्थित होते.
........................................
पवार, पाटील यांचे सहकार्य
............................
यावेळी बोलताना जितोचे उपाध्यक्ष लखीचंद खिवंसरा म्हणाले, या संपुर्ण उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे बहुमोल सहकार्य मिळाले. जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आयुक्त विक्रमकुमार यांनी तातडीने परवानग्या दिल्यामुळेच आम्ही अल्पावधीत सेंटरचे लोकार्पण करू शकलो.
.............
फोटो ओळ
कोविड केअर सेंटरच्मया उद्घाटनाला उपस्थित महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह जितोचे पदाधिकाऱी