हडपसरमधून वाहणाऱ्या मोठ्या आणि बेबी कालव्यातील काही ठिकाणी स्वच्छता केली. मात्र, लक्ष्मी कॉलनी (आर्मी पूल) येथील कालव्यातून कचरा काढून रस्त्यावर टाकला आहे. त्यामुळे गंगानगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. हे वृत्त प्रसिध्द होताच कचरा उचलण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.
सध्या मनपाकडून येथील राडारोडा उचलण्याचे काम फक्त सुरू झाले आहे. हे काम फार मोठे आहे.यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा लागणार आहे. मनपाचे हडपसर क्षेेत्रीय कार्यालयाकडून फक्त एक जेसीबी व एक डंपरद्वारे हे काम सुरू झाले आहे. एवढ्या यंत्रणेवर काम लवकर पूर्ण होणार नाही. यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा लागणार आहे.
हडपसर परिसरातील नवीन मुठा उजवा कालवा आणि जुना कालवा (बेबी कॅनाल) यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गाळ, झाडे झुडपे, कचरा साचलेला आहे, तसेच या दोन्ही कालव्याचे कडेने खूप मोठ्या प्रमाणावर कचरा, डेब्रिज साचलेले आहे. यामुळे येथील नवीन कालव्यातील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदुषित होत आहे. तसेच परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव होत आहे. याचा परिणाम येथील नागरिकांचे आरोग्यावर होत आहे.
हडपसर परिसरातील नवीन मुठा उजवा कालवा आणि जुना डावा कालव्याची (बेबी कॅनाल) संपूर्ण स्वच्छता करणे आणि या दोन्ही कालव्याचे कडेने असलेला राडारोडा, कचरा उचलण्याचे काम पुणे महानगरपालिका आणि जलसंपदा विभाग यांचे संयुक्त प्रयत्नातून करणे आवश्यक आहे. याकरिता प्रसंगी महाराष्ट्र शासनाने २ नोव्हेंबर २०१८ रोजी कालवा स्वच्छता अभियान राबविण्याकरिता घेतलेल्या शासन निर्णयाचा आधार घेण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शशिभूषण होले आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे शहर उपाध्यक्ष सुधीर होले यांनी केली आहे.