राजगुरुनगर : राज्यात महाआघाडी सरकार असताना खेड तालुक्यात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीकडून शिवसेनेची भक्कम फळी फोडत वाघाला घायाळ करण्यात आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उद्धव ठाकरेंनी खासदार संजय राऊत यांना 'खेड मोहिमे'वर पाठवल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला गर्भित इशारा दिला होता. आता याच शिवसेनेच्या सभापतींवर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर बुधवारी मतदान होत आहे. याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या सदस्यांना महत्वाचा आदेश दिला आहे.
शिवसेनेच्या सदस्यांनी व्हीप झुगारुन शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात मतदान केले. पोखरकर यांच्या विरुध्द दाखल केेलेला अविश्वास ठराव दहा विरुध्द तीन अशा मतांनी मंजूर झाला. सभापती पोखरकर न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांनी मतदान सहभाग घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला नसल्यामुळे मतदानास उपस्थित राहिले नाही.
आज विशेष सभेचे पंचायत समितीमध्ये आयोजन करण्यात आले होते. ठरावावर पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली सभा झाली. सभागृहात अविश्वास ठराव मांडण्यात आला. यावर मतदान घेण्यात आले अमोल पवार, ज्योती आरगडे ,मच्छिंद्र गावडे यांनी ठरावाच्या विरोधी मतदान केले. शिवसेनेच्या सुनिता सांडभोर, वैशाली जाधव , सुभद्रा शिंदे, अमर कांबळे, अंकुश राक्षे आणि राष्ट्रवादी चे अरुण चौधरी, मंदा शिंदे, वैशाली गव्हाणे, नंदा सुकाळे, व भाजपाचे विद्यमान उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.
सभापतीविरूध्द शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याला राष्ट्रवादी व भाजप सदस्यांनी साथ दिली होती. सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात मंजूर झालेल्या अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाच्या आदेशाने फेर अविश्वास ठराव घेण्याच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांनी बुधवारी १८ आँगस्टला अविश्वास ठरावाची सभा घेण्याबाबतचे आदेश जारी केले होते.
आम्ही राजकीय सहलीवर असताना भगवान पोखरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जो जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये काही सदस्य जखमी झाले. जीवघेणा हल्ला करून ही पक्ष सांगत असेल सभापतीच्या बाजुने मतदान करा. न पटणारे असुन आम्ही ठरावाच्या विरोधात मतदान केले. पक्षानी व्हीप बजावला असला तरी आम्ही सदस्य शिवसेनेचे आहोत, यापुढे आम्ही शिवसेना पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे अंकुश राक्षे व शिवसेनेच्या सदस्यांनी सांगितले.