पुणे : खाजगी हॉस्पिटलमधील वाढीव बिल, रुग्ण हक्कांची पायमल्ली, दरपत्रके आदी नियमबाह्य कृत्यांबद्दल तक्रार नोंदवण्यासाठी अखेर पुणे महापालिकेच्या आराेग्य विभागाने अखेर सहा महिन्यानंतर का हाेईना तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. १८००२३३४१५१ हा टोल फ्री क्रमांक कार्यालयीन वेळेत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.१५ पर्यंत कार्यान्वित राहील. या क्रमांकावर फोनवरूनही तसेच प्रत्यक्षातही देखील तक्रार दाखल करता येणार आहे. यासाठी आराेग्य क्षेत्रात कार्य करणा-या आराेग्य कार्यकत्यांनी वारंवार पाठपुरावा केला हाेता.
महाराष्ट्र शुश्रुषागृहे नोंदणी नियम २०२१ शासन अधिसूचना १४ जानेवारी २०२१ राेजी राज्यातील हाॅस्पिटल्सना लागु केली आहे. या अधिसुचनेमध्ये सुधारीत नियमांचा अंर्तभाव केला आहे. यानुसार तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. तसेच काही नियमांमध्ये अंशत: बदल व काही नियम उपनियम नव्याने समाविष्ट केले आहेत. यामध्ये नवीन हाॅस्पिटल नाेंदणी व नुतनीकरणासाठीचे शुल्क, वाढीव शुल्क, शुश्रूषागृह तपासणीसाठी प्राधिकृत अधिकारी आदींची स्थानिक पर्यवेक्षीय प्राधिका-याकडे विविध माहिती कळविणे बंधनकारक केले आहे.
या अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे उपचारांचे दरपत्रक, उपचारांची उपलब्धता आहे किंवा नाही या बाबी दर्शविणारे सर्वांना सहजपणे दिसेल व वाचता येतील अशा सुस्पष्ट रितीने मराठी, इंग्रजी भाषेत रुग्णालय किंवा नर्सिंग होमच्या दर्शनी भागात तातडीने प्रदर्शीत करणेत यावेत, असेही यामध्ये नमुद केले आहे. तसेच रुग्ण हक्काची सनद सर्वांना सहजपणे आकलन होईल व वाचता येतील अशा सुस्पष्ट रितीने मराठी व इंग्रजी भाषेत रुग्णालय, नर्सिंग होमच्या दर्शनी भागात तातडीने प्रदर्शित करण्यात यावे असे म्हटले आहे. १८००२३३४१५१ हा टाेल फ्री क्रमांकाचा बोर्ड रुग्णालय, नर्सिंग होमच्या दर्शनी भागात ठळकपणे तातडीने प्रदर्शीत करणेत यावा, असेही आदेशात म्हटले आहे.
कक्ष योग्यप्रकारे कार्यान्वित होऊन पेशंटना न्याय मिळेल
हा तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित व्हावा यासाठी गेले 6 महिने रुग्ण हक्क मोहिमेद्वारे पाठपुरावा केला जात होता. यासाठी पुणे शहरातील खाजगी हॉस्पिटलची पाहणी करून त्याचा अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. आमच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. आता हा कक्ष योग्यप्रकारे कार्यान्वित होऊन पेशंटना न्याय मिळेल याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. - दीपक जाधव, रुग्ण हक्क माेहीम