पुणे : न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर राज्य शासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना 50 हजार रुपये देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. परंतु नक्की किती पैसे व कशा पद्धतीने वाटप करायचे या संदर्भात अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 19 हजार 38 रुग्णांचा मृत्यू झाले आहेत.
कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारांकडून ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने नुकतेच सर्वोच्च न्यायालयाला दिली. राज्य सरकारांच्या आपत्ती निवारण निधीतून ही मदत दिली जाईल, असे देखील स्पष्ट केले. या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज शेकडो लोक फोन व प्रत्यक्ष भेट देऊन पैसे वाटप कधी सुरू होणार याची चौकशी करत आहेत. परंतु या संदर्भात जिल्हा प्रशासनाला कोणत्याही स्वरुपाचे लेखी आदेश अथवा सूचना आलेल्या नाही. या संदर्भात दोन दिवसापूर्वी पैसे वाटप करताना रुग्णांचा मृत्यू नक्की कशाने झाला हे स्पष्ट होत नसले तर अशी प्रकरणे मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे.
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची भरपाई निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) सर्वोच्च न्यायालयाला याबाबत माहिती दिली होती. कोरोनामुळं झालेल्या प्रत्येक मृत्यूसाठी कुटुंबाला 50,000 रुपयांची भरपाई मिळणार आहे. हा पैसा राज्यांच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून मिळणार आहे. सुप्रीम कोर्टानं किमान नुकसानभरपाईबाबत मार्गदर्शक सूचना मागितली होती.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 19 हजार 38 लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. यात ग्रामीण भागातील 4 हजार 644 लोकांचा मृत्यू झाले आहेत. यात अनेक गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील कर्ता माणूस कोरोनामुळे गेल्याने कुटुंबाची परिस्थिती बिकट झाली आहे. यामुळेच शासनाने मदत देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सोमवारी ही मदत मिळण्यासाठी लोकांनी गर्दी केली. परंतू शासनाकडून यासंदर्भात कोणत्याही सूचना, अद्यादेश आले नसल्याचे प्रशासनाने सांगितले.