पुणे महानगरपालिकेतील जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना कामगार कल्याण निधीतून लागू केलेल्या योजनेअंतर्गत अनुदानाचे वाटप करण्यात आले. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पाच कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुदानाचे वाटप करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, आबा बागुल, पृथ्वीराज सुतार, सुनिताताई वाडेकर, अजय खेडेकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर आदी उपस्थित होते.
कामगार सेवकांसाठी कोरोना विषाणू प्रतिबंध व उपचार सुरक्षा कवच योजना लागू करण्यात आली होती. सदर योजनेत त्यांच्या वारसांना २५ लाख अनुदान देण्याची शिफारस करण्यात आली होती. ती पूर्ण झाली असून डिसेंबर २०२० च्या अखेरपर्यंत जीव गमावलेल्या ५१ अधिकारी आणि सेवकांना योजनेअंतर्गत अनुदान वाटप करण्यात येणार आहे.
महानगरपालिका कर्मचारी जीवाची परवा न करता सातत्याने कामावर येत आहेत. त्यामध्ये कचरा वेचकांपासून ते मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. अशा कोरोनायोद्धांचा सत्कार सामाजिक संघटनांकडून होत असतो. पण कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर कुटुंबियांना आधार मिळण्यासाठी हे अनुदान देण्यात आले आहे.