चाकण : चाकण ते आंबेठाण दरम्यानच्या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. सिमेंट काँक्रिटीकरण झालेल्या या रस्त्यावरून वाहनांचा वेग वाढला आहे. वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक लावण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वाटाण्याच्या अक्षता लावल्याने अखेर येथील नगरसेवक विशाल नायकवाडी यांनी स्वखर्चाने गतिरोधक बसवले आहेत.
यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, संचालक नवनाथ होले, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष राम गोरे,उपजिल्हाध्यक्ष राहुल नायकवाडी, संजय गोरे, उद्योगपती राहुल नायकवाडी, सक्सेस ग्रुपचे भरत कानपिळे, मनोज खांडेभराड, व्यंकटेश सोरटे, गुलाब शेवकरी आदी उपस्थित होते.
चाकण ते आंबेठाण रस्त्याचे रुंदीकरणासह सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. रस्ता गुळगुळीत झाल्याने वाहनचालकांनी आपल्या वाहनांचा वेग वाढवला आहे. यामुळे मागील तीन महिन्यामंध्ये तीन जणांना आपले जीव गमवावे लागले, तर अनेकांचे लहानमोठे अपघात रोजच घडत आहेत. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून गतिरोधक बसवण्याच्या करण्यात आलेल्या मागणीला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टाळाटाळ केली जात होती. यामुळे रोज घडणारे लहानमोठे अपघात रोखण्यासाठी व वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरसेवक विशाल नायकवाडी यांनी स्वखर्चातून दावडमळा ते झित्राईमळा दरम्यान सहा गतिरोधक बसवले आहेत. यामुळे वाहनचालकांनी व स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
चाकण-आंबेठाण रस्त्यावर गतिरोधक बसवण्याचे उद्घाटन करताना.