पुणे : बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले या सख्या मेहुण्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात अखेर बांधकाम व्यावसायिक आणि माजी खासदार संजय काकडे शुक्रवारी न्यायालयासमोर हजर झाले. संजय काकडे व उषा काकडे यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी युवराज ढमाले यांनी त्यांच्यावर दि. 1 आॅगस्ट 2020 रोजी चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन येथे एफआयआर दाखल केली होती.
त्यानंतर आरोपी संजय काकडे व उषा काकडे यांना पोलिसांनी दि.4 नोव्हेंबर 2020 रोजी अटक करुन न्यायालयात हजर केले असता दोघांनाही न्यायालयाने काही अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला होता. त्यानंतर एफआयआर व पोलिस तपासाप्रमाणे तीन साक्षीदारांनी न्यायालयात येऊन कलम 164 प्रमाणे आरोपी विरूद्ध साक्ष दिली. परंतु संजय काकडे हे एकदाही न्यायालयात हजर न राहता गैरहजेरी माफी मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज करीत होते.
ढमाले यांनी संजय काकडे यांना पकड वॉरंट काढण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर पुढील सुनावणीस न्यायालयात हजर राहाण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायाधीश निमसे यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि.25) संजय काकडे यांना न्यायालयासमोर हजर व्हावे लागले.