बारामती : बारामती शहर आणि एमआयडीसीतील एसटी कर्मचाऱ्यांचा सलग ११ दिवसांपासून संप सुरुच आहे. मात्र, येथील एसटी आगार प्रशासनाने बारामती - पुणे मार्गावर शिवशाही सुरु करण्यात यश मिळविले आहे. गुरुवारी पोलीस बंदोबस्तात पहिली शिवशाही बस सोडण्यात आली.
कामगारांनी मागील दहा दिवसांपासून कामबंद आंदोलन केल्याने एसटी सेवा पूर्ण बंदच आहे. खासगी वाहतुकीद्वारे प्रवाशांचा प्रवास सुरु आहे. त्यात काही खासगी वाहतुक व्यावसायिकाकडुन जादा दराने प्रवाशी वाहतुक सुरु होती. प्रवाशांकडुन याबाबत तक्रारी वाढल्यानंतर उपप्रादेशिक परीवहन विभागाने सबंधितांवर बुधवारी दंडात्मक कारवाई केली. प्रवाशांनी या कारवाईचे स्वागत केले.
त्यापाठोपाठ आजपासून शिवशाही बस सुरु केल्याने बारामती पुणे प्रवास देखील सुकर झाला आहे. बारामती आगारातून सकाळी पुणे ते बारामती पहिली शिवशाही बस रवाना करण्यात आली. प्रवाश्यांची संख्या पाहता आणखी शिवशाही बस रवाना करण्याची शक्यता आहे. तसेच स्वारगेट बस स्थानकात देखील तिकीट बुकिंगची सोय करण्यात आली आहे. आज शिवशाही बसने प्रवास करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला ४४ सीटच्या बस मध्ये ४६ प्रवाश्यांनी प्रवास केल्याची माहिती आगर प्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली.
ही सेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे चालवली जात असली तरी या चालणाऱ्या बस या खासगी कंत्राटदारांच्या आहेत. चालक हाच वाहकाचे काम करतो. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बारामती आगारातून एकही महामंडळाची बस बाहेर पडली नव्हती. मात्र पुणे मार्गावर शिवशाही सुरू झाल्यामुळे या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
एसटी महामंडळाच्या सर्व सोयी - सुविधा देखील प्रवाशांना मिळणार
बारामती पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच बारामतीतून पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवाही बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना टप्प्या - टप्प्याने चढ्या दराने खासगी गाडयांनी प्रवास करावा लागत होता. मात्र शिवशाही चालू झाल्याने ‘बजेट’मध्ये विनाथांबा प्रवास होणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. सोबतच महामंडळाच्या सर्व सोयी - सुविधा देखील प्रवाशांना मिळणार आहेत. त्यामुळे लहान मुलांना घेऊन प्रवास करणारे ,ज्येष्ठ नागरिकांच्या खिश्यावरील भार हलका होणार आहे. पाच गाड्यांपेकी आज आगरातून २ ते ३ गाड्या सोडण्यात येणार असल्याचे अगार प्रमुखांनी सांगितले. स्वत: आगारप्रमुख बस बुकिंग करून पैसे तब्यात घेत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.