ʻएमएनजीएलʼ कडून काम पूर्ण : कोंडी, अपघाताच्या धोक्यापासून मुक्तता
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी मंदिराच्या परिसरातील नारायण जगताप चौकात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी करून ठेवलेल्या खोदकामामुळे झालेल्या समस्येची अखेर तड लागली आहे. ʻलोकमतʼमध्ये बातमी प्रसिध्द होताच रस्त्याची दुरूस्ती करण्यात आल्याने वाहतूक कोंडी आणि छोट्या-मोठ्या अपघातांचा धोका टळणार आहे.
ʻएमएनजीएलʼ सध्या स्वयंपाकाच्या गॅससाठी जमिनी खालून वाहिन्या टाकण्याचे काम करत आहे. सिंहगड रस्त्यावरील नारायण जगताप चौकामध्ये सुरू असलेल्या कामाच्या वेळी महानगरपालिकेच्या गटारी फुटल्याने सुमारे महिनाभर सांडपाणी रस्त्यावरुन वाहत होते. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे वारंवार खोदकाम करावे लागत असल्याने महापालिका दुरूस्ती काम करू शकत नव्हती.
गॅस वाहिन्या टाकल्यानंतरही काही दिवस फुटलेल्या मलवाहिन्यांचे काम खोळंबले होते. त्यामुळे सखल भागात पाण्याचे डबके साचले होते तसेच चौकामध्ये करून ठेवलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची त्रेधा होत होती. ‘लोकमत’ने याबाबत छायाचित्रासह सविस्तर वृत्त रविवारी (दि. २९) प्रसिद्ध केले. त्यानंतर ʻएमएनजीएलʼने युध्द पातळीवर काम पूर्ण करीत महापालिकेला दुरूस्तीची सूचना केली.
त्यानुसार, दोन दिवसांपूर्वी खड्ड्यांचे डांबरीकरण युद्धपातळीवर सुरू झाले तसेच त्यापूर्वी गटाराचे पाणी वाहून नेणाऱ्या नवीन वाहिन्या टाकण्यात आल्या. त्यामुळे सांडपाण्याचा प्रवाह अनेक दिवसांनी संपुष्टात आला. गुरुवारी देखील त्या चौकांमध्ये डांबरीकरणाचे आणि देखभालीचे काम सुरू होते.
चौकट
या भागातून नेहमी जाणारे रिक्षाचालक नंदकिशोर यादव यांनी सांगितले की, रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे पंधरा दिवस खूप त्रास झाला. वाहतूक कोंडी होऊन मनस्ताप होत होता. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे ही समस्या दूर होत आहे. याबद्दल ʻलोकमतʼला धन्यवाद. याच परिसरातील रहिवासी सुधीर सुबकडे म्हणाले, “वर्दळीच्या भागातील समस्येबाबत सरकारी यंत्रणा ढीम्म असल्याचा मन:स्ताप लोकांना भोगावा लागला.”
.......................
फोटो जेएमएडीट वर आहे