पुणे : लाॅकडाऊन असताना देखील जीव धोक्यात घालून मार्केट यार्डातील सर्व बाजार घटक आपले कर्तव्य बजावत आहेत. यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासूनची मार्केट यार्डातील सर्व बाजार घटकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. सोमवार (दी.१०) रोजी मार्केट यार्डात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आणि दि पूना मर्चंट चेंबरच्या सहकार्याने हमाल भवन येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.
पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते या लसीकरण केंद्राचे उद्घाटन केले. बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, दि पूना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष अशोक लोढा, सहसचिव विजय मुथा, माजी अध्यक्ष, नगरसेवक प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठीया, कुणाल ओस्तवाल, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, मार्केट यार्ड कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, अध्यक्ष किसन काळे, तोलनार संघटनेचे हनुमंत बहिरट उपस्थित होते.
रुबल अग्रवाल म्हणाल्या, शहरात उपलब्धतेनुसार लसीचा पुरवठा आणि लसीकरण केंद्र वाढविली जात आहे. लसीकरणामुळे मृत्युदर कमी होत असून पॉझिटिव्ह रेट कमी होत आहे. तसेच लसीकरणानंतर पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णांना त्रास कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. आढाव म्हणाले, लस म्हणजे पूर्णपणे बरे होण्याचे औषध नाही. मात्र, कोरोनविराेधात प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम लस करते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन काम करावे. सर्वांनी आपल्या घरांची साफसफाई करण्याची मोहीम हाती घ्यावी.
गरड म्हणाले, येथील केंद्रावर प्रथम प्राधान्याने ४५ वर्षांपुढील बाजार घटकांचे लसीकरण केले जात आहे. त्याबरोबर येथे तापाचा दवाखाना सुरू केला असून ताप असल्यास कोरोना तपासणीची सुविधाही उपलब्ध केली आहे.