पुणे : फळेभाजीपाला विभागाच्या आवारात सुरू केलेल्या पार्किंग सुविधेस काही बाजार घटकांनी विरोध दर्शवत बाजार बंदचा इशारा दिला होता. आडते असोसिएशन आणि टेम्पो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत पार्किंग शुल्क आकारणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवारपासून पुकारलेला बेमुदत बंद मागे घेण्यात आला आहे.
फळे भाजीपाला बाजारात येणाऱ्या खरेदीदार व्यापाऱ्यांच्या तीन व चारचाकी वाहनांना दोन तासांसाठी अनुक्रमे ५०, १०० रुपये पार्किंग शुल्क आकारण्यास बुधवारपासून (दि. १०) सुरुवात केली होती. त्यास विरोध झाला. पार्किंग शुल्क आकारणीसंदर्भात घेतलेल्या बैठकीत नाममात्र वार्षिक शुल्क घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष अमोल घुले, संतोष नांगरे, राजेंद्र कोरपे, राजेंद्र रेणूसे, विशाल केकाणे आदी यावेळी उपस्थित होते.
तीन चाकी टेम्पोचालकांकडून वाराई शुल्क आकारणार नाही
''ठेकेदारामार्फत पार्किंग शुल्क घेण्याऐवजी सर्व खरेदीदार टेम्पो धारकांकडून नाममात्र दरात वार्षिक वाहनतळ सुविधा शुल्क एकरकमी आकारण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. तीन चाकी टेम्पोचालकांकडून वाराई तसेच भराईचे शुल्क आकारण्यात येणार नाही असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी सांगितले''
शुल्क किती घ्यायचे आज ठरणार
पार्किंग शुल्क बाजार समितीने रद्द केल्याचे बैठकीत जाहीर केले आहे. चर्चेअंती नाममात्र प्रवेश शुल्क घेण्यास मान्यता दिली आहे. उद्या (गुरूवारी) सकाळी ८ वाजता गणपती मंदिर येथे खरेदीदार आणि टेम्पो चालक यांची बैठक होईल. या बैठकीत किती प्रवेशशुल्क द्यायचे हे ठरेल. तो प्रस्ताव बाजार समितीला देण्यात येईल, असे यावेळी टेम्पो संघटना व कामगार युनियनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.