पुणे : भविष्यात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण देण्यासाठी नवजात बाळाच्या नाळेतील रक्त प्रीझर्व्ह (स्टेमसेल्स) करून ठेवले आहे, असे भासवून बायोटेक कंपनी बंद करून पसार झालेला ठग अखेर न्यायालयास शरण आला आहे. त्याने आतापर्यंत ६५० जणांची २६ लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.डॉ. चैतन्य अरुण पुरंदरे (वय ४८, रा. हरेकृष्ण मंदिर रस्ता, मॉडेल कॉलनी) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी यापुर्वी कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. आरोपी २०१६ साली कंपनीची जागा आणि नाळ जतन करायचे बंद साहित्य विकून पसार झाला होता. याबाबत स्मिता गोपाल तिजुरी (वय ६०, रा. मुकुंदनगर, स्वारगेट) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार डॉ. चैतन्य पुरंदरे याच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. पुरंदरे यांने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी न्यायालयाने त्यास पुणे न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याला बुधवारी ताब्यात घेतल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक यू. एच. माळी यांनी दिली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, पौड रस्त्यावरील शीला विहार कॉलनी येथे सुदर्शन अपार्टमेंटमध्ये डॉ. चैतन्य कॉर्ड लाइफ बायोटेक कार्यालय होते. २७ मे २००८ ते २ जून २००८ या कालावधीत फिर्यादी यांची मुलगी डिलेव्हरीसाठी स्वारगेट येथील पाटणकर नर्सिंग होम्स येथे दाखल झाली होती. त्या वेळी त्यांचा विश्वास संपादन करून डॉ. चैतन्य पुरंदरे आणि त्याच्या साथीदार महिलांनी स्टेमसेल्सबद्दल त्यांना माहिती दिली. तुमच्या बाळाच्या नाळेतील रक्त प्रीझर्व्ह केले जाईल. भविष्यात त्याला कोणतेही आजारपण आले, तर त्यावर औषध शोधता येऊ शकते. त्यामुळे त्याला संरक्षण मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी त्यांच्याकडून ६५ हजार रुपये घेण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ. पुरंदरेने गाशा गुंडाळल्याचे समोर आले. डॉ. पुरंदरे न्यायालयात हजर झाला असता अॅड. एस. ए. क्षीरसागर यांनी युक्तिवाद केला.साठवलेल्या ६६० स्टेमसेल्स खराबआरोपींनी साठवलेल्या ६६० स्टेमसेल्स खराब झाल्याचा अहवाल नॅशनल केमिकल एक्स्पर्टने दिला आहे. स्टेमसेल्स घेतल्यापासून त्या २१ वर्षे जतन करण्याचा करार आरोपी आणि स्टेमसेल्स देणाºया व्यक्तींत झाला होता. मात्र त्यापूर्वीच पुरंदरे याचे भिंग फुटले आहे.
६५० जणांना गंडा घालणारा अखेर न्यायालयास शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 3:27 AM