पुणे :भिगवण येथे शालेय मुलीचे लौंगिक शोषण करणाऱ्या नराधम शिक्षकाला अखेर जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे. या माध्यमातून जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटनांची गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.
भिगवण येथील शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेत दादासाहेब खरात या शिक्षकाला निलंबित केले आहे. या प्रकाराबाबत चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्याच्या प्राथमिक अहवालानुसार संबंधित शिक्षक दोषी आढळला. त्यानंतर प्रसाद यांनी हा निर्णय घेतला. याबाबत ते म्हणाले, “हे अतिशय गंभीर प्रकरण असून यात कोणाचीही गय केली जाणार नाही. या प्रकरणात स्थानिक पुढारी तसेच नागरिकांकडून संबंधितावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच काही स्थानिक मुक्त पत्रकारांनी संबंधित मुलीशी तसेच तिच्या सोबतच्या मुलांची चौकशी केल्याचे कळले आहे. हे प्रकरण पोस्को कायद्यांतर्गत येत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांना यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. यात कोणताही खासगी किवा शासकीय व्यक्ती आढळून आल्यास त्याची गय केली जाणार नाही.”
जिल्ह्यात एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सुमारे ७४ हजार जणांना मुलांच्या अत्याचारांबाबत नेमके काय करावे याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचा दृश्य परिणाम आता दिसून येत आहे. अशा प्रकारच्या घटनेचे रिपोर्टिंग होण्याची ही दुसरी वेळ आहे. याचाच अर्थ नागरिक आता याबाबत स्पष्टपणे बोलत आहेत. अशा घटनांची नोंद होत असून त्यातून निष्कर्षही निघत आहेत. जिल्हा परिषदेत लैंगिक घटना उघड झाल्यानंतर आतापर्यंत ६० हून अधिक जणांना निलंबित करण्यात आले आहे. पोस्को कायद्यात अनेक बाबी गोपनीय ठेवाव्या लागतात. त्यामुळे या घटनेत काही त्रुटी राहिल्या असल्यास संबंधित सर्व जबाबदार व्यक्तींवर कारवाई होईल हे निश्चित अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.