कळस (पुणे) : इंदापूर तालुक्यातील काझड अकोले हद्दीत निरा भीमा प्रकल्पाच्या ३०० फुट खोल बोगद्यात दोन शेतकरी पडले होते. ही घटना बुधवारी (दि. २२) सायंकाळी घडली होती. यामध्ये या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढण्यात आले. सकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लाकडी कळस मार्गावर या प्रकल्पाच्या एका ‘ओपन स्पेस’ मधून हे शेतकरी बोगद्यात टाकलेल्या विद्युतपंपाची तपासणी करण्यासाठी गेले होते. या पंपामधून पाणी येणे बंद झाल्याने हे दोघे त्या ठिकाणी गेले होते. दरम्यान, हे दोघे सायंकाळी उशिरानंतर देखील घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांचा शाेध घेण्यासाठी नातेवाईक घटनास्थळी पोहचले. मात्र, त्यांचा इतरत्र कोठेही शोध लागला नाही. दरम्यान, पाणी येत नसल्याने विद्युतपंपाची पाहणी करण्यासाठी खाली उतरत असताना तोल जाऊन दोघेजण ३०० फुट खोल बोगद्यात पडले गेले होते.
अनिल नरुटे (वय ३५) आणि रतिलाल नरुटे (वय ५५) अशी दोघा शेतकऱ्यांची नावे आहेत. हे दोघे चुलते पुतणे आहेत. दरम्यान, या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलीस व प्रशासन तातडीने घटनास्थळी आले. बचावकार्य पथकाला त्यांना वाचविण्यात अपयश आले.