बारामती : ‘मला लागीर झालं आहे’ या भावनेने पछाडलेल्या एका अंधश्रद्धाळू नागरिकाला ‘अंनिस’च्या पदाधिकाऱ्याने स्मशानभूमीत दिलेले धडे कौतुकाचा विषय ठरले आहेत. अनोख्या अंधश्रद्धा निर्मूलनामुळे ‘त्या’ नागरिकाला मनातील आणि अंगातील भूत पिशाच्चापासून सुटका मिळाली आहे.
‘अंनिस’चे बारामतीचे पदाधिकारी विपुल पाटील यांच्या ऑफिसमध्ये तो हताशपणे आला. हातामध्ये केशरी, पिवळ्या आणि काळ्या रंगाचे अनेक धागे गुंडाळून, कपाळाला भस्म लावून तो आला. त्याने मला लागीर झालयं, माझा स्वत:वरचा कंट्रोल सुटलाय. प्रत्येक गोष्टीत नुकसान होतंय. अनेक बुवा, बाबा, मांत्रिक बघितले, पण फरक पडत नाही. माझ्यामध्ये घुसलेली ही भूतं शेवटी मला घेऊनच जातील, असे सांगत भूत पिशाच्चाने झपाटल्याची भीती व्यक्त केली.
त्यावर पाटील यांनी त्याला समजावून सांगत मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला. मानसोपचार तज्ज्ञांनी त्याचे समुपदेशन केले. मात्र, याउलट त्याने त्यांच्याकडे जाणे बंद केले. मात्र, मांत्रिक बुवा बाबांकडे जाणे आणि पैसे घालवणे सुरूच होते.
काही दिवसांनंतर तो पुन्हा पाटील यांच्याकडे आला. त्यांनी त्याला देवीच्या मंदिरात जाऊन येऊ, असे सांगत जवळ असणाऱ्या स्मशानभूमीत नेले. प्रेताला जाळतात त्या ग्रेव्हयार्डवर बसून स्वत:च्या सेल्फी घेतल्या. त्यालाही त्यांचे एक-दोन फोटो काढायला लावले. त्याला थोडेसे धाडस आले. मग त्याने स्वत:ही तिथे बसून स्वत:च्या सेल्फी घेतल्या; परंतु अचानक त्याला पोटात मळमळायला लागल्यासारखं वाटलं. तीन-चारवेळा त्याने उलटी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला उलटी होत नव्हती. काही विचारले तर हातानेच थांबण्याची खूण करत होता.
शेवटी पाटील यांनी त्याला जबरदस्तीने नक्की काय होतंय, अशी विचारणा केली. त्याने ही जागा खूप चांगली आहे. या उलटीतून माझ्या आतील चार भूतं निघाल्याची कबुली दिली. मात्र, आणखी एक इतर धर्मीय भूत राहिल्याची भीती त्याने व्यक्त केली. मात्र, पाटील यांनी केलेली मात्रा लागू पडल्याचे संकेत त्याने दिले. काही वेळ थांबून दोघे स्मशानभूमीतून निघून आले. काही दिवसांनंतर त्याच्यात सकारात्मक बदल झाले. मागच्या काही दिवसांपासून तो अगदी सुव्यवस्थित आहे. त्याच्या मनातील भूत पिशाच्च निघून गेले आहे. कुठल्यातरी गोष्टीमुळे त्याला फरक पडल्याचे तो सांगत आहे. पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये हा किस्सा नमूद केला आहे.