नसरापूर : मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्यासोबत विवाह करणे तरुणासह त्याचे नातेवाईक, तसेच मुलीच्या आई-वडिलांना चांगलेच महागात पडले आहे. भोर तालुक्यातील माळेगाव (ता. भोर) येथे पार पडलेल्या बाल विवाहप्रकरणी राजगड पोलिसांनी कारवाई करत तरुण, त्याची आई, नातेवाईक तसेच मुलीचे आई-वडील अशा १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मुळशी तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा वेल्हा तालुक्यातील हारपूड येथील शुभम रामचंद्र राजिवडे (वय २३, रा. हारपूड, ता. वेल्हा) या तरुणासोबत मुळशी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह रविवार (ता. ७) आयोजित केला होता. फोनवरून घटनेची माहिती मिळाल्यावर राजगड पोलिसांनी कारवाई केली. पोलिस शिपाई सचिन नरुटे, मंगेश कुंभार, प्रशांत राऊत यांनी मंगल कार्यालयात जाऊन व नवरी मुलीच्या जन्मतारखेची शहानिशा केल्यानंतर मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. हा गुन्हा असल्याचे संबंधितांना सांगून राजगड पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई सचिन नरुटे यांनी फिर्याद दिली आहे.
या विवाहप्रकरणी नवरा मुलगा शुभम रामचंद्र राजिवडे, रामचंद्र निवृत्ती राजिवडे (वडील), सीता रामचंद्र राजिवडे (आई), रा. हारपूड, ता. वेल्हे, मामा अनिल रामभाऊ रेणुसे, मामी वैशाली अनिल रेणुसे, आकाश सुनील राजिवडे, अभिषेक रवींद्र चव्हाण, कुणाल मधुकर शिरोळे, चैतन्य रामचंद्र राजीवडे, शंतनू शिवाजी पवार, कुशाल मधुकर शिरोळे व लग्न लावणारे ब्राह्मण सुनील खासनीस त्याच बरोबर अल्पवयीन मुलीचे आई, वडील, मामा, मामी व इतर नातेवाईक असे एकूण १५ जणांवर नसरापूर येथील राजगड पोलिस ठाण्यात बालविवाह कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. संबंधितांवर बालविवाह प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना नोटीस देण्यात आली आहे, तर अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन तिच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस फौजदार संजय सुतनासे यांनी दिली.
मुलगी ही अल्पवयीन असल्याने हा विवाह लावता येणार नाही, तसे झाल्यास आपल्याविरुद्ध गुन्हे दाखल होतील, अशी माहिती वधू- वराच्या मंडळींना पोलिसांकडून मिळाल्याने अखेर हा अल्पवयीन मुलीचा विवाह थांबला.