राजू हिंगे/ अतुल चिंचली -
पुणे : अज्ञानरूपी अंधार दूर करण्यासाठी महात्मा जाेतिबा फुले आणि क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ राेजी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली हाेती. हाच भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावा यासाठी लढा दिला जात हाेता. तब्बल १३ वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर हा मार्ग सुकर झाला आणि साेमवारी (दि. ४) रात्री माेठ्या पाेलिस बंदाेबस्तात भिडेवाड्याचा ताबा महापालिकेने घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने भिडे वाड्याचे जागा मालक आणि भाडेकरूना नोटीस देऊन पंचनामा केला. साेमवारी रात्री उशिरा महापालिकेने कडेकोट पोलीस बंदोबस्तात या वाड्यातील जागेचा प्रत्यक्ष ताबा घेतला. या जागेचे भूसंपादन करण्यात महापालिकेला अखेर यश आले आहे.
फुले दाम्पत्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या आठवणी जपण्यासाठी म्हणून भिडेवाडा हा राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. गेली १३ वर्ष न्यायालयीन लढा सुरू होता. भिडे वाड्याची जागा एका महिन्यात म्हणजे ३ डिसेंबरपर्यंत महापालिकेच्या ताब्यात द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने जागा मालक आणि भाडेकरूंना दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेच्या भूसंपादन विभागाने सोमवारी दुपारी भिडेवाडा येथे जाऊन जागा मालक आणि भाडेकरू यांना नाेटीसा देऊन पंचनामा केला. पण तेथील बहुतांश ठिकाणचे दुकाने बंद होते. त्यामुळे नोटीस देता आली नाही. त्यानुसार प्रशासनाने पंचनामा करून घेतला आहे.
पुणे महापालिकेने भिडे वाड्याचा प्रत्यक्ष ताबा घेण्याची कारवाई साेमवारी रात्री उशिरा सुरू केली. या कारवाईसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या कारवाईत महापालिकेने क्रेन, तीन जेसीपी, सहा ट्रक आणि कर्मचारी तैनात ठेवले होते.
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, भूसंपादनच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, पोलीस उपायुक्त संदीपसिंह गील यांच्यासह अधिकारी वर्ग आणि महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बघ्याचीही मोठी गर्दी झाली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने पोलिस बंदोबस्तात साेमवारी भिडे वाड्याचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका