पुणे: शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यासाठी व्यावसायिकाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह १४ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) ची कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्यात मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) ची कारवाई केली होती. गजानन मारणे वाई येथील त्याच्या वकील विजयसिंह ठोंबरे यांच्या फार्म हाऊस वर कायदेशीर सल्ल्यासाठी आला होता. त्यावेळी पुणेपोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुण्याकडे रवाना झाले आहेत.
दरम्यान या कारवाईत सचिन ऊर्फ पप्पू दत्तात्रय घोलप (वय ४३, रा. धनकवडी), हेमंत ऊर्फ आण्णा बालाजी पाटील (वय ३९, रा. बुरली, ता. पलूस, जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय ४६, रा. कोडोवली, जि. सातारा), फिरोज महंमद शेख (वय ५०, रा. समर्थनगर, कोडोवली, जि. सातारा), गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड) (टोळीप्रमुख), रुपेश कृष्णाराव मारणे (रा. कोथरुड), संतोष शेलार (रा. कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दोपोडी), अजय गोळे (रा. नऱ्हे), नितीन पगारे (रा. सातारा), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, सहकारनगर), नवघणे अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. यात चौघांना अटक केली आहे. या घटनेनंतर गजा मारणे व इतर फरार झाले होते.
खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या तपासात या टोळीने परिसरात आपले वर्चस्व निर्माण व्हावे व इतर अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा, याकरिता हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार तसा प्रस्ताव पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांना पाठविण्यात आला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर या टोळीवर मोक्का कारवाई केली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्याकडे सोपविण्यात आला. गजा मारणे मार्च महिन्यात स्थानबद्धतेच्या कारवाईतून सुटून बाहेर आला होता. त्यानंतरही त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरू असल्याचे दिसून आले होते.