नम्रता फडणीस
पुणे : गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित ‘डिजिटल इंडिया वीक २०२२’च्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या थिंकरबेल लॅब्सच्या स्टॉलवर आले आणि ‘आप कहाँ से हो?’ असे त्यांनी मला विचारले. मी पुण्यात राहतो असे सांगितल्यावर ते माझ्याशी चक्क मराठीतूनच बोलले. ‘प्रथमेशसारखी आत्मविश्वासी मुले देशाचे भवितव्य चांगले बनवत आहेत,’ असा उल्लेख त्यांनी केला तेव्हा माझा माझ्याच कानांवर विश्वासच बसला नाही, अशा शब्दांत ११ वर्षांचा अंध मुलगा प्रथमेश सिन्हा याने पंतप्रधानांच्या भेटीचा अनुभव कथन केला.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा ‘फॅन’ आहे. त्यांना दोनदा भेटण्याचा प्रयत्न केला. एकदा पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनासाठी आणि दुसऱ्यांदा देहूत आले होते तेव्हा; पण त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र या अचानक झालेल्या भेटीने मी भारावून गेलो, असेही प्रथमेश म्हणाला.
तो गांधीनगरच्या ‘डिजिटल इंडिया वीक २०२२’ मध्ये कशासाठी सहभागी झाला होता, असा प्रश्न सर्वांनाच प्रश्न पडला असेल. तिथे बेंगळुरूस्थित थिंकरबेल लॅब्सचं एक दालन होतं. शिक्षण सर्वसमावेशक बनवण्याच्या दृष्टिकोनातून थिंकरबेल लॅब्सने एक ‘ॲनी’ नावाचे ब्रेल आधारित उत्पादन तयार केले आहे. ज्यायोगे कोणताही मुलगा हा केवळ अपंगत्वामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये. तिथं तो उपस्थित होता. ‘शार्क टँक इंडिया’मधून तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. प्रथमेश हा आशुतोष कुमार आणि दीपशिखा सिन्हा यांचा मुलगा. प्रथमेश सध्या ऑर्किड्स : द इंटरनॅशनल स्कूल, उंड्री येथे इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत आहे.
प्रथमेशच्या यशाविषयी त्याची आई दीपशिखा म्हणाल्या, प्रथमेश दीड वर्षाचा होता तेव्हा त्याच्यावर ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे त्याची दृष्टी थोडी अंधुक झाली होती. सामान्य शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आम्हाला खूप लढा द्यावा लागला. प्रथमेश २०१९ पर्यंत होम स्कूलमध्येच शिक्षण घेत होता. पूना स्कूल आणि होम फॉर द ब्लाइंडमध्ये त्याला दाखल केले होते, तिथे तो थिंकरबेल लॅब्सच्या टीमला भेटला आणि ॲनीबद्दल त्याने माहिती जाणून घेतली. कोरोनाकाळात शाळा बंद असताना त्याने ॲनीचा वापर केला. त्याचा तो ब्रँड ॲम्बॅसडर बनला. २०१९ मध्ये पुन्हा एक दुर्दैवी घटना घडली. प्रथमेशला पुन्हा ट्यूमर झाल्याचे निदान झाले आणि त्याला रेडिएशनसाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये जावे लागले. लोकांना प्रेरित करण्यासाठी तो रुग्णालयात इतका प्रसिद्ध झाला की डॉक्टर त्याला उचलून त्यांच्या रुग्णांशी बोलण्यासाठी घेऊन जायचे. बोन मॅरो दान मोहिमेत वक्ता म्हणून त्याला बोलावण्यात आले आणि त्यानंतर त्याला वक्ता म्हणून बोलण्याच्या अनेक संधी मिळाल्या.
मला ‘आयएएस’ अधिकारी व्हायचं आहे
मला देशाची सेवा करण्यासाठी ‘आयएएस’ अधिकारी व्हायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक कीर्तीचे नेते आहेत. देशाच्या विकासासाठी ते चांगले काम करीत आहेत. मोदी यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिले, आता अजून काय हवं? असे प्रथमेश सिन्हा याने सांगितले आहे.