नीरा : पुणे जिल्हा शिक्षण विभागाने या आठवड्यात तंत्रस्नेही शिक्षकांची कार्यशाळा कार्यालयीन वेळेत आयोजित करण्याचे फर्मान काढले होते. केंद्रस्तरीय कार्यशाळेचे आयोजन नजरचुकीने शनिवारी मोहरम सणाची सुट्टी असताना आयोजित केल्याने शिक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. कार्यशाळेच्या वेळेत बदलाबाबत विविध शिक्षक संघटनांनी पत्र दिले होते. त्यामुळे आता शनिवारी होणारी कार्यशाळा तालुकास्तरावर गटशिक्षण अधिकारी यांनी त्यांच्या अधिकारात नियोजन करुन अन्य दिवशी घ्यावे. अशा तोंडी सूचना आज शुक्रवारी दिल्या आहेत.
पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी केंद्रस्तरीय विद्या समीक्षा कार्यशाळा मोहरम या राष्ट्रीय सणाच्या दिवशी आयोजित केली होती. या कार्यशाळेची वेळेमध्ये बदल करावा अशी लेखी स्वरुपात मागणी पुणे जिल्हा शिक्षक समिती व पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना पुणे व इतर शिक्षक संघटनांनी केली होती.
या संदर्भात लोकमतने देखील बुधवारी (२६ जुलै) रोजी 'सुटी दिवशी शिक्षकांची कार्यशाळा आयोजित केल्याने आश्चर्य !' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे शिक्षणाधिकारी गायकवाड यांना सदर दिवशीची कार्यशाळा रद्द करावी लागली. मात्र ही कार्यशाळा रद्द करत असताना शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी लेखी आदेशा ऐवजी संघटना प्रतिनिधींनी विचारणा केल्यावर शनिवारी (दि. २९ जुलै) होणारी विद्या समीक्षा कार्यशाळा मोहरम सुट्टी मुळे रद्द करून अन्य दिवशी घेण्यात यावी व सदर प्रशिक्षण तालुकास्तरावर गटशिक्षण अधिकारी यांनी त्यांच्या अधिकारात नियोजन करुन अन्य दिवशी घ्यावे. अशा तोंडी सूचना दिल्याचे शिक्षक समिती व पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे ग्रुप वर व्हाट्सअप द्वारे दिल्या. मात्र याबाबतीतचे लेखी पत्र शिक्षणाधिकारी यांनी दिले का ? किंवा शिक्षणाधिकारी गायकवाड यांचे कार्यशाळा आयोजना बाबत लेखी पत्र आहे. तर कार्यशाळा रद्द केल्याचा देखील लेखी पत्र का नाही? असा प्रश्न शिक्षक संघटनांकडून विचारला जात आहे.