पुणे: गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेचा विषय ठरलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्यांच्या सुमारे १४९ कोटी रुपयांच्या निविदेला अखेर मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. भूसंपादनाचे काम दोन महिन्यात मार्गी लावून लवकरात लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सदस्यांना दिले. कात्रज, हडपसर परिसरातील वाढती लोकसंख्या व वाहनांची वाढलेली मोठी संख्या यामुळे कात्रज-कोंढवा रस्त्यांवर प्रचंड वाहतुक कोंडी होते. प्रचंड वाहतुक कोंडी, रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे या परिसरात सातत्याने अपघात होतात. त्यामुळे या रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून सुरु होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राजस सोसायटीपासून कोंढवा येथील खडी मशिनमार्गे पिसोळी येथील महापालिकेच्या हद्दीपर्यंत ८४ मीटर रुंद विकास आराखड्यातील रस्त्याची आखणी करण्यात आली. या रस्त्याच्या कामासाठी पटेल इस्टेट कंपनीने महापालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या दराच्या २२.३० टक्के कमी दराने १४९ कोटी ५२ लाख रुपयांची निविदा भरली होती. निविदा प्रक्रियेत ही एकच कंपनी सहभागी झाली होती. कात्रज-कोंढवा रस्त्यांसाठी आलेल्या एकमेव निविदा प्रक्रियेला अखेर मान्यता देण्यात आली. या कंपनीबरोबर करार करण्यास व कामासाठी कमी पडणा-या आर्थिक तरतुदीसाठी पथ विभाग व प्रकल्प विभागाकडील अखर्चित रकमेचे वर्गीकरण करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. कात्रज चौक ते सासवड फाटा हा रस्ता १९८१ पासून प्रादेशिक विकास योजना आराखड्यानुसार ८४ मीटर रुंदीचा प्रस्तावित असून या रस्त्याची एकूण लांबी १२.१ किलोमीटर आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ पुणे बंगळूर रस्ता व राष्ट्रीय महामार्ग ९ पुणे सोलापूर रस्ता यांना जोडणारा मार्ग म्हणून घोषणा करण्यात आली. या रस्त्यांपैकी पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात कात्रज-कोंढवा रस्त हा ६० मीटर मुख्य रस्ता व दोन्ही बाजून १२ मीटर सर्व्हिस रस्ता असा एकूण ८४ मीटर रुंदीने दाखविण्यात आला आहे. हा रस्ता मुंबईकडून बंगळूरकडे पुण्याहून जात असताना बाह्य वळणावर येतो.अस्तित्वातील रस्ता सर्वसाधारणपणे १० ते १५ मीटर रूंदीचा असून रस्त्याच्या दोन्ही बाजूस पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्जन्यवाहिन्या नसल्याने व प्रचंड वाहतूक असल्याने खराब होतात. दरदिवशी पंचावन्न हजार वाहने या रस्त्याने वाहतुक करतात. या रस्त्यासाठी ३५०० मीटर लांबीचे व ८४ मीटर रुंदीचे एकूण २ लाख ९४ हजार चौरस मीटर जागेच्या उपलब्धतेनुसार काम करावे लागणार आहे. त्यापैकी सुमारे ४० टक्के जागा सध्या महापालिकेच्या ताब्यात आली असून, येत्या दोन महिन्यात आणखी ४० टक्के जागेचे भूसंपादन पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याची माहिती योगेश मुळीक यांनी दिली.------------श्रेयासाठी राजकारणमंगळवार (दि.२५) रोजी झालेल्या स्थाय समितीच्या बैठकीत कात्रज-कोंढवा रस्त्यांच्या १४९ कोटी रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली. परंतु या रस्त्यांच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी काही सदस्यांमध्ये चांगली स्पर्धा लागली. यामुळे प्रस्ताव मंजुर होताच शिवसेनेच्या नगरसेविका संगीत ठोसर, मनसे गटनेते वसंत मोरे यांनी महापालिकेत पेढे वाटले. तर भाजपच्या रंजना टिळेकर यांनी मतदार संघात जाऊन थेट नागरिकांनाच पेढे वाटून आनंद व्यक्त केला. श्रेयासाठी सुरु असलेल्या या राजकारणाची महापालिकेच चांगलीच चर्चा रंगली.
अखेर कात्रज-कोंढवा रस्त्यांच्या कामाला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 8:26 PM
कात्रज, हडपसर परिसरातील वाढती लोकसंख्या व वाहनांची वाढलेली मोठी संख्या यामुळे कात्रज-कोंढवा रस्त्यांवर प्रचंड वाहतुक कोंडी होते.
ठळक मुद्देस्थायी समितीच्या बैठकीत निर्णय ; दोन महिन्यात भूसंपादनाचे काम पूर्णएकूण २ लाख ९४ हजार चौरस मीटर जागेच्या उपलब्धतेनुसार काम करावे लागणार श्रेयासाठी सुरु असलेल्या या राजकारणाची महापालिकेच चांगलीच चर्चा