लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हवेली आणि मुळशी तालुक्यातील २३ गावे पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्याने या गावांमध्ये लसीकरण कोणी करायचे? असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सध्या या २३ गावांमध्ये सुरू आहे तसेच लसीकरण सुरू राहणार आहे. परंतु या गावातील लसीकरण त्वरित पूर्ण करण्यासाठी महापालिकेने अतिरिक्त लसीचे डोस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडी सरकारने पुणे शहरालगतच्या २३ गावांबाबत अध्यादेश काढून ही गावे पुणे महापालिका हद्दीतील समाविष्ट केली. यासोबतच या गावांमध्ये कार्यरत असलेली जिल्हा परिषदेची यंत्रणा देखील महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे. यामुळे यापुढे २३ गावांमध्ये सर्व कामे महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहेत. यामुळेच महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांतील लसीकरण कोणी करायचे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
परंतु याबाबत आयुष प्रसाद यांनी सांगितले की, सध्या या गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जिल्हा परिषदे मार्फत नेहमीप्रमाणे सुरू आहे तशी लसीकरण सुरूच राहणार आहे. केवळ जास्तीचे लसीकरण करायचे असेल तर महापालिका प्रशासनाने अधिकची लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे. महापालिकेने अधिकची लस उपलब्ध करून दिल्यास या गावांतील लसीकरण अधिक गतीने पूर्ण होईल, असे आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.
-