बारामती : देशातील लोकसभा निवडणुकांसाठी जवळपास १८ महिन्यांचा कालावधी आहे. मात्र भाजप ने आता पासूनच राज्यात ‘ग्राऊंड लेवल’ पासुन काम करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाची पुर्ण वेळ प्रभारी पदाची जबाबदारी देशाच्या तिजोरीच्या चाव्या असणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आली आहे. याबाबत बारामती दौऱ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देशपातळीवर भाजप विरोधी मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दुसरीकडे भाजपने ज्येष्ठ नेते पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे नेतृत्त्व करीत असलेल्या बारामती लोकसभा मतदासंघात खुद्द निर्मला सीतारामन यांना उतरविले आहे. याबाबत बावनकुळे यांनी या मतदारसंघातील रणनीती उलगडली. बावनकुळे यांनी सांगितले कि, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या पुर्णवेळ प्रभारी आहेत. सीतारामन या पुढील १८ महिन्यात बारामती लोकसभा मतदासंघात पाच ते सहा वेळा येतील. प्रत्येक वेळी मतदारसंघात त्या तीन दिवस मुक्काम करणार आहेत. येथील विकासकामांची या दौऱ्यात माहिती घेण्यात येईल. मतदारसंघासाठी गरज असणाऱ्या कामांचा त्या आढावा घेतील. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून संबंधित मतदारसंघातील आवश्यक विकासकामे करण्याबाबतचा त्या आढावा घेतील.तसेच केंद्र सरकारच्या सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या योजनांची गेल्या अडीच वर्षात झालेली अंमलबजावणी, सर्वसामान्यांपर्यत या योजना पोहोचल्या का,याचा देखील आढावा या दौऱ्यात सीतारामन घेणार आहेत.तसेच केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या योजनांचे गेल्या अडीच वर्षातील आॅडीट होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.