पुणे : कुटुंबातील सदस्याचा खून झालेल्या कुटुंबीयांना विधी सेवा प्राधिकरणाकडून २ लाख २ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. खुनाच्या गुन्ह्यात बळी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना विधी सेवा प्राधिकरणाकडून देण्यात येते. प्रमुख जिल्हा न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण, विधी सेवा प्राधिकरण सदस्य आर. व्ही. कोकरे, अॅड. अतुल गुंजाळ यांच्या समितीने हा आदेश दिला. प्रमोद ऊर्फ पप्पू भाऊराव ओव्हाळ (वय ४८, रा. कान्हे, ता. मावळ) यांचा ९ जानेवारी २०१४ रोजी धारदार हत्यारांनी वार करून खून करण्यात आला होता. जखमी अवस्थेत उपचार घेत असताना त्यांचा १० जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. पत्नी सारिका, मुलगी तन्वी आणि आर्या, आई इंदूबाई यांनी न्यायालयात नुकसानभरपाई मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता. हा अर्ज पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे दाखल करण्यात आला होता. अर्जदारांची चौकशी करून संबंधितांनी त्यांना दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई आणि अंत्यविधीचा खर्च म्हणून २ हजार रुपये अशी एकूण २ लाख २ हजार रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
खून झालेल्या कुटुंबाला आर्थिक भरपाई
By admin | Published: December 23, 2016 1:14 AM