पुणे : काही दिवसांपासून वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकतो. ही अफवा व्यावसायिकांची डोकेदुखी ठरत आहे. रुग्णसंख्या कमी झाली नाही, तर २ एप्रिलला लॉकडाऊनचा निर्णय होऊ शकतो. नागरिक देखील सावधगिरीने पावले टाकू लागले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीच अफवेने व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित बिघडू लागले आहे. यामुळे छोटे व्यावसायिक चांगलेच चिंतेत पडले आहे.
कोरोनासोबत जगायचे आहे तर लॉकडाऊन कशाला, असे काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तर एकदाचे लॉकडाऊन लागू करून लसीकरण मोहीम प्रभावी पद्धतीने राबवावी. जेणेकरून वाटणारी भीती कमी होईल. लसीकरण मोहीम संथगतीने सुरु आहे. असा आरोप काही व्यावसायिकांनी केला आहे. रुग्णसंख्या कमी होणार नाही. हे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन होणारच आहे, याची खात्री तर पुन्हा ते पुढे किती काळ वाढत जाईल याची भीती देखील त्यांना भेडसावत आहे.
कोट
लॉकडाऊनच्या अफवेनेच नागरिक धास्तवले आहेत. आता कुठे लोक बाहेर पडू लागले होते. खर्च करू लागले होते. लॉकडाऊनच्या भीतीने आखडता हात घेतला जात आहे. दिवसाला ८ ते १० दुचाकी सर्व्हिसिंगसाठी येत होत्या. कोरोनामुळे व्यवसाय कोलमडला आहे. आता दिवसाला एखादी दुचाकी आली तर येते. पुन्हा व्यवसाय ठप्प होऊ लागला आहे. लॉकडाऊनबाबत एकदाचे काय ते ठरवावे.
- वैभव भोसले, दुचाकी गॅरेज व्यावसायिक
कोट
कोरोनाची भीती आहे. सध्या फुलबाजाराचा हंगाम कमी प्रमाणात असला, तरी कोरोनाचे सावट आहे. किमान १० ते १५ दिवस बाजार सुरु ठेवावा की बंद, यावर चर्चा सुरू आहे. गर्दी कमी व्हावी असे अनेकांचे मत आहे. जो वर प्रशासन ठरवत नाही तोवर निर्णय घेतला जाणार नाही. मार्केट यार्डमधील जीवनावश्यक वस्तूंचा बाजार सुरू राहतोच.
- सुनील गोयकर, फूलबाजार व्यापारी
कोट
लॉकडाऊन लावणे हा पर्याय नाही. ऑर्डर कमी झाल्या आहेत. कार्यक्रम साजरे करण्यावर मर्यादा आल्याने व्यवसायाला फटका बसला आहे. मागील वर्ष रिकामे गेले. या वर्षात तरी अपेक्षा होती. पण अशा परिस्थितीमुळे अवघड स्थिती निर्माण होईल असे वाटते. लॉकडाऊन लागू न करता कडक निर्बंध लावले तरी चालतील.
- मनीष तोडकर, फोटो अँड इव्हेंट व्यावसायिक
कोट
कोणत्या जन्माचे पाप फेडतोय असे वाटत आहे. रुग्णसंख्या वाढू लागल्याने निर्बंध लागू केले आहेत. नेमकी ग्राहकांची वेळ असते, नेमके त्याच वेळी दुकाने बंद करायला सांगितले जाते. भाडे कसे भरावे, बँकेचे हप्ते थकलेले आहेत. मुलांच्या शाळांचे शुल्क भरण्यास सांगितले आहे. आम्ही जगतोय आम्हाला जगू द्या. लॉकडाऊनमद्ये फक्त कष्टकऱ्यांचे मरण होते.
- रतनसिंग राठोड, चहा विक्रेते, व्यावसायिक
कोट
कोरोनाचा सर्वांत जास्त परिणाम आमच्या व्यवसायावर झालेला आहे. लॉकडाऊन लागू झाले किंवा खुले राहिले तरी होणार परिणाम तेवढाच आहे. सध्या बिकट अवस्था आमची झालेली आहे. मागच्यावेळी मदत मिळाली. मात्र मदत करणाराच अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही. किमान आता एक वेळच्या जेवणाची सोय होईल एवढे उत्पन्न मिळते. तेही बंद होईल.
- मधुकर गवळी, रिक्षाचालक
कोट
मागच्या लॉकडाऊनमध्ये खूप त्रास सहन करावा लागला आहे. कोरोनामुळे आमचा व्यवसाय धोक्यात आला आहे. आता कुठे कोरोनाची भीती लोकांच्या मनातून चालली होती. मात्र, पुन्हा रुग्ण वाढू लागल्याने ग्राहकांची संख्या कमी होऊ लागली आहे. २ एप्रिल लॉकडाऊन लागू झाले तर पुढे करायचे काय, या चिंतेने ग्रासले आहे.
- पोपट राऊत, सलून व्यावसायिक
कोट
कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. दिवसाला पोटापुरती कमाई होत होती. ती देखील आता कमी होऊ लागली. कसे जगावे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा बंद असल्याने ग्राहक नाहीत. एवढ्या वर्षात अशी परिस्थिती कधी पहिली नव्हती.
- रामभाऊ कारंडे, चर्मकार व्यावसायिक
कोट
आयटी क्षेत्र ब्रॅंड असल्याने रोजगार गेला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून भाजीविक्रीचा धंदा करतोय. लॉकडाऊन लागू झाला तरी हा धंदा बंद पडणार नाही. त्यामुळे उत्पन्न थांबणार नाही याची शाश्वती आहे. कधी या परिस्थितीतून बाहेर पडतोय असे झाले आहे.
- रमाकांत शिंदे, भाजी विक्रेते