पुणे ( पिंपरी) : जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषी आशा सर्व वर्गवरीतील १७ लाख ७७ हजार ग्राहकांकडे ४ हजार ३२४ कोटी रुपये थकीत आहेत. त्यातील १ हजार रुपयांची थकबाकी मार्च ते सप्टेंबर २०३० या टाळेबंदी काळामध्ये वाढली असल्याची माहिती महावितरणने दिली. वाढत्या वीज बिल थकबाकीमुळे महावितरण समोरील आर्थिक संकट गडद झाले आहे.
कोरोनापूर्वी (कोविड १९) पुणे जिल्ह्यातील सर्व वर्गवरीतील बारा लाख दोन लाख ग्राहकांकडे ३,१९० कोटी रुपयांची थकबाकी होती. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्या नंतर वीज बिलांचा भरणा कमी होत गेला. मार्चपासून सप्टेंबरपर्यंत सर्व श्रेणीतील थकबाकीदार ग्राहकांची संख्या ५ लाख ७२ हजारांनी वाढली आहे. त्यांच्याकडे ६४४ कोटी ३७ लाख रुपयांची थकबाकी आहे.
टाळेबंदी उठवल्यानंर वीज मीटरवरील नोंदी घेऊन बिल देण्यास जून महिन्यापासून सुरुवात करण्यात आली. सुरुवातीस बिलाबाबत ग्राहकांना अनेक शंका होत्या. बिल मोठ्या प्रमाणावर आल्याच्या तक्रारींचा पाऊस महावितरणवर पडला होता. या बाबत शंका निरसन करण्यात आल्यानंतरही बिल भरणा वाढला नाही. अशीच स्थिती राहिल्यास महावितरणवरील आर्थिक संकट अधिक गहिरे होईल अशी भीती महावितरण कडून व्यक्त करण्यात येत आहे. वीज मागणी आणि वीज पुरवठा यामध्ये आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी वीज ग्राहकांच्या सहकाऱ्याची आवश्यकता आहे. दरमहा वसुल झालेल्या बिलातील ८० ते ८५ टक्के रक्कमेतून वीज खरेदी केली जाते. थकबाकी वाढत राहिल्यास वीज खरेदीसाठी पैसे आणायचे कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बिल भरण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
-----
-जिल्ह्यातील थकबाकीदार ग्राहक १४,७१,७००
-घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक थकबाकी ९३० कोटी
-कृषी पंप आणि इतर थकबाकीदार ग्राहक ३,०५,९००
- कृषी पंप आणि इतर थकबाकी ३,३३९ कोटी ९३ लाख
-एकूण थकबाकीदार १७,७७,५००
-एकूण थकबाकी ४,३२४ कोटी
----