- राहुल शिंदेपुणे : एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डशिवाय केवळ बोटांच्या ठशांचा वापर करून बँकेशी निगडीत आर्थिक व्यवहार करता येतील, असे सर्व आयटीदृष्ट्या सक्षम व हॅक न करता येणारे आधुनिक बायोमेट्रिक उपकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने तयार केले आहे. या उपकरणाद्वारे ग्राहकांना बोटाचे ठसे देऊन घरबसल्याही आर्थिक व्यवहार करता येणे शक्य होणार आहे.विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने बायेमेट्रिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधन केले असून तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम बायोमेट्रिक उपकरण तयार केले आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करण्यासाठी आता केवळ हाताच्या बोटांचे ठसे पुरेसे ठरणार आहेत. याबाबत माहिती देताना विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले, विभागाने तयार केलेले उपकरण हे आधार सर्व्हरशी जोडण्यात आले आहे.आधारच्या सर्व्हरवरून संबंधित व्यक्तीच्या बोटाचे ठसे जुळत असल्याचा संदेश उपकरणावर आल्यानंतर आर्थिक व्यवहाराची प्रक्रिया सुरू होते. प्लास्टिक, जिलेटिन किंवा डेंटल मटेरियलपासून तयार केलेल्या कोणत्याही कृत्रिम हाताच्या बोटांच्या ठशांचा वापर करून हे उपकरण हॅक करता येणार नाही, याबाबतची काळजी तंत्रज्ञान विभागाने घेतली आहे. या उपकरणाकडून बोटांमधील जिवंतपणा (लाइव्हनेस) तपासला जातो. कृत्रिक बोटांच्या ठशांचा वापर करून आर्थिक व्यवहार करणे कोणालाही शक्य होणार नाही. आधार सर्व्हरने ठसे तपासून दिल्यानंतर बँकेचे काही प्रोटोकॉल ग्राहकांना पूर्ण करावे लागतील. त्यानंतर कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना पैसे काढता येतील, अशा प्रकारची सुविधा देणारे आधुनिक उपकरण विद्यापीठाने तयार केले आहे, असे त्यांनी सांगितले.विद्यापीठ किती उपकरणे, कशी तयार करून देईल, याची माहिती विद्यापीठातर्फे बँकेला कळविण्यात आल्याचे अभ्यंकर यांनी सांगितले.एसबीआयकडून चाचपणीसध्या स्टेट बँक आॅफ इंडियाने बायोमेट्रिक उपकरण ग्राहकांना उपलब्ध करून देण्याबाबत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी बँकेने विद्यापीठाकडून काही उपकरणे तपासणीसाठी घेतली आहेत. या उपकरणांवर थंड व उष्ण वातावरणात चाचणी घेण्याचे काम सुरू आहे. बँकेने बायोमेट्रिक उपकरण घेण्यास प्राथमिक तयारी दर्शविली आहे.- डॉ. आदित्य अभ्यंकर
बोटांच्या ठशांवरून घरबसल्या करता येणार आर्थिक व्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 3:09 AM