लोणावळा : आम्ही मुंबईत येण्यापूर्वी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढावा. चर्चेला तयार आहोत. मात्र, चर्चा करण्यासाठी या तिघांनी यावे. इतर कोणाला पाठवू नये, मराठा समाजाचा एकही तरुण तुम्हाला काही बोलणार नाही, तसा शब्द मी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना देतो, मराठा समाजाला आरक्षण ‘ओबीसी’मधूनच हवे आहे, अशी ठाम भूमिका मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी वाकसईचाळ येथील सभेत गुरुवारी मांडली. मी उपोषण हे आझाद मैदानावरच करणार आहे. मुंबईत कोणतीही गडबड, गोंधळ होणार नाही, याचा शब्द मी समाजाच्या वतीने देतो. आमची व मुंबईकरांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी शासनाने घ्यावी.
सरकार सकारात्मक आहे, आंदोलन थांबवा; मुख्यमंत्री शिंदे सरकार सकारात्मक नसेल तर आंदोलन ठीक आहे. पण, सरकार सकारात्मक आहे. तमाम मराठा समाजाला आवाहन आहे, सरकार तुमचेच आहे. मराठा समाजाला सोयीसुविधा देण्याबाबत सरकार हात आखडता घेणार नाही. इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण देण्यावर सरकार ठाम आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे.
जेवणात जुलाबाचे औषध टाकले जाऊ शकते : आंबेडकरमनोज जरांगे पाटलांच्या जेवणात जुलाबाचे औषध टाकले जाऊ शकते. त्यामुळे त्यांनी चार जणांमध्ये जेवण न करता पंगतीत जेवण करावे. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला.