लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एटीएममधून पैसे न मिळाल्याने बँकेचा कस्टमर केअर नंबर गुगल अॅपवर शोधणे महागात पडले. सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्याची गोपनीय माहिती घेऊन तब्बल ६३ हजार रुपयांना गंडा घातला.
याप्रकरणी वानवडीतील एका ४७ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली. फिर्यादी या काही महिन्यांपूर्वी लष्कर भागातील महात्मा गांधी रोडवरील एका बँकेच्या एटीएम सेंटरला गेल्या होत्या. त्यांनी १० हजार रुपये काढण्यासाठी सर्व प्रक्रिया केली. परंतु, एटीएम मशीनमधून पैसे आले नाहीत. तसेच मेसेजही मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी गुगल अॅपवरून बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधला. दुर्दैवाने तो नंबर बँकेऐवजी सायबर चोरट्याचा होता. त्यांनी आपली तक्रार सांगितल्यावर त्याने सर्व गोपनीय माहिती या महिलेकडून काढून घेतली. त्यानंतर काही मिनिटातच त्यांच्या खात्यातून ६३ हजार ८१० रुपयांचे व्यवहार करून फसवणूक केली.