काँग्रेसचा पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा शोध एक-दोन दिवसांत संपण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 08:41 PM2019-03-22T20:41:50+5:302019-03-22T20:51:31+5:30
काँग्रेस पक्षाच्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा शोध एक-दोन दिवसात संपण्याची चिन्हे आहेत.
पुणे : काँग्रेस पक्षाच्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा शोध एक-दोन दिवसांत संपण्याची चिन्हे आहेत. स्थानिक नेत्यांमधूनच उमेदवाराची निवड केली जाणार आहे. शुक्रवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत याविषयी झालेल्या बैठकीत या नावांवर अंतिम चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या नावाची उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्यात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या लोकसभा मतदारसंघापैकी १७ ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यासह सात मतदारसंघामध्ये उमेदवारांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. पुण्यामध्ये काही दिवसांपुर्वी भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे व प्रविण गायकवाड यांच्या नावाची चर्चा होती. पण स्थानिक काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी आयात उमेदवारांना तीव्र विरोध केला. त्यामुळे ही नावे मागे पडली. आता काँग्रेस नेतृत्वाने स्थानिक नेत्यांनाच प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. शहरातून माजी आमदार मोहन जोशी, माजी शहराध्यक्ष अ?ॅड. अभय छाजेड, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांची नावे चर्चेत आहेत.
मागील काही दिवसांपासून नवी दिल्लीत उमेदवारीवरून खल सुरू असला तरी अद्याप तिढा सुटलेला नाही. त्यामुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. दिल्लीत शुक्रवारच्या बैठकीत सायंकाळपर्यंत नाव निश्चित होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यासाठी पुण्यातून जोशी, छाजेड व शिंदे हे तिघेही दिल्लीत ठाण मांडून असल्याचे समजते. पण प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उशिरा दाखल झाल्याने ही बैठक लांबली. रात्री उशिरा ही बैठक झाल्याचे समजते. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रभारी सोनल पटेल व अन्य काही वरिष्ठ नेतेमंडळी बैठकीला हजर होते. या बैठकीत पुण्यातील उमेदवाराचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. पण कोणाच्या गळ्यात ही माळ पडणार, हे काँग्रेसच्या उमेदवारांच्या अधिकृत यादीतूनच स्पष्ट होणार आहे.