पुणे : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी सर्व जण प्रयत्न करीत असतानाच, सार्वजनिक ठिकाणी कबुतर-पारव्यांना धान्य टाकून ‘पुण्य’ कमावण्याचा सोस बाळगणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झालेली नाही. मानवी आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या अनेक घातक विषाणूंचा प्रसार करणाऱ्या या कबुतर-पारव्यांचा सार्वजनिक ठिकाणचा वावर रोखण्यासाठी आता महापालिकेने कारवाई करण्याचे ठरवले आहे. कबुतर व पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.उद्याने, मैदाने, चौक, सार्वजनिक ठिकाणे, नदी पात्र अशा अनेक ठिकाणी कबुतर-पारव्यांना काही लोक धान्य टाकत असतात. अशा लोकांची माहिती जागरुक पुणेकरांनी महापालिकेला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.राज्यातल्या अनेक महापालिकांनी सार्वजनिक ठिकाणी कबुतर-पारव्यांना धान्य टाकणाऱ्या लोकांना दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तशेखर गायकवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘‘शहरात अनेक ठिकाणी विशेषत: मोकळ्या जागी, इमारतींच्या गच्चीवर व किराणा मालाच्या दुकानांसमोर पारव्यांना, कबुतरांसाठी धान्य टाकण्यात येते़ परंतु या पक्ष्यांची विष्ठा व पिसे ही सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी पडल्याने विविध आजारांना निमंत्रण मिळते़ या आजाराचा संसर्गही घातक असून, या पक्ष्यांना धान्य टाकून आमंत्रित करण्याची कायद्याने बंदी आहे़ परंतू आजमितीला याकडे दुर्लक्ष करून अनेक जण या पक्ष्यांना धान्य टाकून त्यांना गोळा करतात. त्यामुळे या पक्ष्यांचा वर्दळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपद्रवही वाढला अ़ाहे़ परिणामी आता महापालिका कबुतर व पारव्यांना धान्य टाकून आमंत्रित करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे़’’ कबुतर-पारव्यांना धान्य टाकण्याच्या कृत्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने सध्या मुंबई महापालिका अशा व्यक्तींना दहा हजार रुपये दंड ठोठावते. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकाही शहरात अशा व्यक्तींकव दंडात्मक कारवाई करणार असल्याचे आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले़
पुणेकरांवर आली कबुतर जा जा म्हणण्याची वेळ ; महापालिकेने उचलले " हे " पाऊल...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 8:21 PM
कबुतर व पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार
ठळक मुद्देकबुतर-पारव्यांना धान्य टाकणाऱ्या लोकांना दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यास सुरुवात कबुतर व पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार