पुणे : रस्त्यावरील अपघाताच्या संख्येत निम्म्याने घट करण्याचा प्रयत्नांचा भाग म्हणून शहर पोलीस दलाने दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घेतला होता़. त्यानंतर संपूर्ण शहरात रस्त्यावर तसेच सीसीटीव्ही मार्फत कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली़. डिसेंबर २०१८ मध्ये तब्बल ४० हजार ५४८ दुचाकी वाहनचालकांवर कारवाई करुन त्यांच्यावर २ कोटी २ लाख ७४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती़. जानेवारी महिन्यांपासून सीसीटीव्ही व प्रत्यक्ष रस्त्यावर वाहनचालकांना थांबावून पोलिसांनी जोरदार कारवाईला सुरुवात केली होती़. त्यामुळे पहिल्या चार महिन्यात प्रत्यक्ष रस्त्यावर व सीसीटीव्ही मार्फत तब्बल ७ लाख ६२ हजार ६४ वाहनचालकांवर ३८ कोटी १० लाख ३२ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे़. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ मध्ये पुणे शहरात ७९ हजार ३५ दुचाकी वाहनचालकांवर विना हेल्मेटची कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर ३ कोटी ९५ लाख १७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता़. वाहतूक पोलिसांच्या रस्त्यावरील या दहशतीमुळे हेल्मेट वापरण्याचे प्रमाण ४५ टक्क्यांपर्यंत वाढले होते़. त्याचवेळी सीसीटीव्ही मार्फत दिवसाला ५ हजार पर्यंत वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत होती़. या कारवाईमुळे शहरात हेल्मेटसक्तीविरोधात आंदोलनही करण्यात आले़. पोलीस आयुक्तालयातील ‘भरोसा सेल’च्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात आले होते़. त्यावेळी त्यांना हेल्मेसक्ती विरोधी कृती समितीने भेट घेऊन ही कारवाई थांबविण्याची मागणी केली होती़. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना काही सूचना दिल्याचा दावा शहरातील आमदारांनी केला होता़. मात्र, त्यानंतरही पोलिसांची कारवाई कायम राहिली़. फक्त वाहतूक पोेलीस हेल्मेटची किती कारवाई केली, याची आकडेवारी देण्यास त्यांनी टाळाटाळ सुरु केली़. त्याबरोबर शहर पोलीस दलाकडून शहरात पहिल्या चार महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत ११ प्राणघातक अपघात कमी झाल्याचा दावा करुन तो हेल्मेटसक्तीमुळे झाल्याचे सांगण्यात येत होते़. सीसीटीव्हीवरुन केलेल्या हेल्मेट कारवाईच्या दंड वसुलीसाठी शहरात पोलिसांनी चौकाचौकात वाहनचालकांना अडवून मोबाईलवर संबंधित वाहनचालकावर किती गुन्हे आहेत, याची तपासणी सुरु केली़. त्या वाहनचालकांवर हेल्मेटसह झेब्रा कॉसिंग व इतर गुन्हे असेल तर त्याच्याकडून दंडवसुली सुुरु केली होती़.
हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर सीसीटीव्हीमार्फत कारवाई करण्यात येते़. पर्वती दर्शन येथील एका दुचाकीस्वार तब्बल ३७ वेळा सीसीटीव्हीमध्ये सापडला होता़. त्याच्याकडून १८ हजार ७०० रुपये दंड वसुल करण्यात आला होता़, अशाप्रकारे दोनपेक्षा अधिक वेळा दंड असणाऱ्या टॉप १०० दुचाकीस्वारांची वाहतूक शाखेने यादी केली होती़.