पुणे : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी म्हणून २३ मार्च रोजी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांवर विनाकारण रस्त्यांवर फिरण्यासह अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात आले होते.तरीदेखील लोक या पोलीस व प्रशासनाच्या विनाकारण घराबाहेर पडू नका या आवाहनाकडे दुर्लक्ष करून व नियमांचे सर्रास उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे अशा नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलताना पोलिसांनी त्यांची वाहने जप्त केली होती. लॉकडाऊनच्या काळात विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या जप्त केलेल्या वाहनांकडून पोलिसांनी तब्बल ४८ लाख ७ हजार रुपये दंड वसुल केला आहे. या काळात जप्त केलेल्या सुमारे ५०० वाहने नागरिकांनी अजूनही परत नेली नाहीत.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय इतरांनी घराबाहेर पडू नये, असे पोलिसांनी आवाहन केले होते. तरीही नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येत होते. त्यामुळे विनाकारण वाहनांवरुन फिरणाऱ्या वाहनचालकांची वाहने पोलिसांनी जप्त केली होती. लॉकडाऊन हटवून अनलॉक सुरु झाल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून जप्त केलेली वाहने परत देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ३६ हजार ८७० वाहने परत करण्यात आली असून त्यांच्याकडून ४८ लाख ७ हजार दंड वसुल करण्यात आला आहे. अजून साधारण ५०० वाहनचालकांनी त्यांची वाहने परत नेली नसून दंड भरुन नागरिकांनी आपली वाहने परत घेऊन जावे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.