पुणे : नवीन विद्यापीठ कायद्यानुसार आगामी शैक्षणिक वर्षांमध्ये महाविद्यालये तसेच विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडणुका घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निवडणुकांचे परिनियम तयार करण्यासाठी मंगळवारी माजी कुलगुरू आर. एस. माळी यांच्या समितीची बैठक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पार पडली. निवडणुकांचे आयोजन करण्याबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करून त्याबाबतच्या काही परिनियमांना अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. त्याचबरोबर बुधवारीही ही बैठक सुरू राहणार आहे.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठांच्या विभागांमध्ये निवडणुका घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व महाविद्यालये व विद्यापीठांच्या विभागांना निवडणुका घेणे बंधनकारक आहे. निवडणुकांचे परिनियम तयार करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू आर. एस. माळी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मंगळवारी समितीच्या बैठकीमध्ये विविध मुुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)राजपत्रात प्रसिद्ध होणार प्रक्रियेची माहितीआगामी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. महाविद्यालयांची सुरुवातीचे दोन महिने अभ्यासक्रम सोडून निवडणुकींच्या गदारोळात जाणार आहेत. या निवडणुकांची रणधुमाळी कशी निभावून न्यायची, हा यक्षप्रश्न अनेक प्राचार्यांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकांचे परिनियम तयार करताना याबाबतची योग्य तरतूद व्हावी, अशी अपेक्षा अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून व्यक्त केली जात आहे.निवडणुकांच्या परिनियमांबाबत समितीकडून शिफारशी केल्या जाणार आहेत. त्यानंतर महाविद्यालयांमधील निवडणुकीची प्रक्रिया, अधिकार व कर्तव्ये, निवडणूक घेणारे प्राधिकरण, निवडणूक यंत्रणा, उमेदवार व प्रशासक यांच्यासाठी आचारसंहिता, निवडणुकांसंबंधी तक्रार यंत्रणा याबाबतची सर्व माहिती राज्य शासनाकडून राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.
परिनियमनाचे काम अंतिम टप्प्यात
By admin | Published: May 03, 2017 2:48 AM