लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भागीदारी संपुष्टात आल्यानंतरही ओमसाई आॅटोमोबाईल्सच्या टे्रड सर्टिफिकेटचा वापर करून दुचाकी वाहनांची विक्री केल्याप्रकरणी नगररचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर, पत्नी संगीता नाझीरकर यांच्याविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल केला असल्याचे पत्र दत्तवाडी पोलिसांनी न्यायालयाला दिले आहे. ओमसाई आॅटोमोबाईलचा धनादेश वापरुन साडेसहा लाख रुपये परस्पर स्वत:च्या खात्यात जमा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या फिर्यादीमध्ये न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीचा सर्व उल्लेख असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी नितीन साहेबराव पाटील (रा. कर्वेनगर) यांनी न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली होती. सहसंचालक नगररचना हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय ५३), पत्नी संगीता हनुमंत नाझीरकर (वय ४२, दोघेही रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरूड) आणि नवनाथ आॅटोमोबाईल कंपनीचे भागीदार प्रवीण सोरटे (३०, रा. सिंहगड रोड, पर्वती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दत्तवाडी पोलिसांना दिले आहेत. याप्रकरणी ओमसाई आॅटोमोबाईलच्या नावाने बनावट कागदपत्र तयार करुन जवळपास १८० दुचाकींची विक्री केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. पाटील यांच्या ओमसाई आॅटोमोबाईल्समध्ये हनुमंत नाझीरकर यांनी भागीदारी केली होती. नाझीरकर स्वत: शासकीय नोकरीमध्ये असल्याने त्यांनी पत्नीला पाटील यांची भागीदर बनविले होते. त्यांच्यामध्ये झालेल्या वादातून मार्च २०१६मध्ये भागीदारी तोडण्यात आली. तेव्हा नाझीरकर यांना पाटील यांनी ६८ लाख रुपये दिले. त्यानंतर नाझीरकर आणि प्रवीण सोरटे यांनी नवनाथ आॅटोमोबाईल कंपनी स्थापन केली. मात्र, त्यांनी आरटीओकडून टे्रड सर्टिफिकेट न घेता ओमसाई आॅटोमोबाईल कंपनीच्या टे्रड सर्टिफिकेट तसेच सेल्स लेटरचा वापर करुन १८० गाड्यांची ग्राहकांना विक्री केली. नाझीरकर आणि सोरटे यांनी ओमसाई आॅटोमोबाईलचे टे्रड सर्टिफिकेट आरटीओमधून त्यांच्या संमतीशिवाय नूतनीकरण करुन घेतल्याचा आरोप पाटील यांनी केला होता.
नाझीरकरांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल
By admin | Published: July 01, 2017 8:04 AM