पुणे - पत्नी आणि मुलाच्या मदतीने 1988 पासून दीड कोटी रुपयांची बेकायदेशीर माया जमावणाऱ्या महाराष्ट्र कृषी शिक्षण विभागातील माजी शिक्षण विस्तार व साधन सामुग्री संचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश नामदेव अंबुलगेकर (वय 60 वर्ष) असे संचालकाचे नाव असून ते महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत विस्तार शिक्षण व साधन सामग्री विभागाचे संचालक होते. त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी मंगाराणी अंबुलगेकर (वय 56वर्ष) आणि मुलगा नितीन अंबुलगेकर (वय 30 वर्ष) यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबुलगेकर यांच्या विरोधात तक्रार आल्यानंतर त्यांच्याकडे करण्यात आलेल्या उघड चौकशी दरम्यान त्यांनी जुलै 1980 ते जुन 2014 या कालावधीत 1 कोटी 55 लाख 15 हजार 426 रुपयांची बेकायदेशीर माया जमवल्याचे निष्पन्न झाले आहे. या कामात त्यांना पत्नी व मुलगा यांनी जाणीवपूर्वक संगनमत करून अपप्रेरणा दिली असल्याचे निष्पन्न झाले.
अंबुलगेकर यांची नांदेड, औरंगाबाद, लातूर आणि पुणे येथे मालमत्ता असल्याचे तपासातून समोर आले असून त्यात अनेक फ्लॅट आणि भुखंड असल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले आहेत. त्यांची 2014 पासून चौकशी सुरू होती. या काळात त्यांनी ही सगळी संपत्ती कशाच्या माध्यमातून कमवली याची कागदपत्रे पोलिसांनी मागितली होती, मात्र या संपत्तीबाबत ते कोणतेही योग्य कागदपत्रे देऊ शकले नाही. त्यानंतर तिघांवरही विभागाने गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या औरंगाबाद, लातूर, नांदेड आणि पुण्यात असलेल्या मालमत्तेवर छापे टाकले.