पुणे : वानवडी येथील सोळंके ज्वेलर्स या दुकानाला पहाटे लागलेल्या आगीत दुकानातील फर्निचर जळून खाक झाले. त्यात शोकेसमध्ये ठेवलेल्या चांदीच्या मूर्ती आगीत सापडल्याने त्या वितळून त्यांचा गोळा झाला. लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवले असल्याने ते मात्र वाचले. या घटनेत आग विझविताना काच लागल्याने त्यात निलेश वानखेडे हे जवान जखमी झाले आहेत.
वानवडी येथील परमार पार्क सोसायटीत सोळंके ज्वेलर्स या दुकानाला सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. दुकानातून धूर येत असल्याचे पाहून नागरिकांनी अग्निशमन दलाला सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी खबर दिली. कोंढवा अग्निशमन दलाचया केंद्रातून तातडीने एक गाडी घटनास्थळी रवाना झाली. ही आग शेजारील दुकानात ही आग पसरणार नाही, याची काळजी घेत, अग्निशमन जवानांनी शटर उचकटून पाण्याचा मारा सुरु केला. काही वेळात आग विझविली.
याबाबत प्रभारी अधिकारी कैलास शिंदे यांनी सांगितले की, शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुकानातील शोकेसमध्ये चांदीच्या मूर्ती व इतर वस्तू ठेवल्या होत्या. आगीत त्या वितळून त्यांचा गोळा झाला. तो मालकाकडे सोपविला आहे. लॉकरची व दुकानातील डायर्यांची माहिती अगोदर दिल्याने आगीपासून त्या वाचविण्यात यश आले. सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवले असल्याने ते वाचले. या आगीत दुकानातील सर्व फर्निचर जळून खाक झाले. कोंढवा केंद्राचे अधिकारी कैलास शिंदे, तांडेल महादेव मांगडे, फायरमन सागर दळवी, निलेश वानखेडे, दिनेश डगळे, चालक सत्यम चौखंडे यांनी ही आग विझविली.