वडगाव कांदळी : पुण्यातील जुन्नरमध्ये चौदा नंबर, कांदळी येथील विक्रम मंडप डेकोरेटरच्या गोडाऊनला सोमवारी (दि.२६)पहाटे ३ च्या दरम्यान अचानकपणे आग लागली. या आगीत सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये किंमतीचे मंडप व डेकोरेशनचे साहित्य जळून खाक झाले. ही माहिती मंडप डेकोरेटरचे मालक आणि कांदळीचे सरपंच विक्रम भोर यांनी दिली. या आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.
गोडाऊनमध्ये डेकोरेशनचे लाकडी फर्निचर, स्टेज, शाही खुर्च्या, सोफासेट, प्लायवुड, गादया, रेशमी कापड, सजावटीचे साहित्य, सीसीटीव्ही कॅमेरे , कामगारांच्या ५ मोटरसायकली असे सुमारे अडीच कोटी रुपये किंमतीचे मंडप आणि डेकोरेशनचे साहित्य होते. सोमवारी पहाटे ३ च्या वाजण्याच्या सुमारास गोडाऊनला आग लागली. या बाबतची माहिती सरपंच विक्रम भोर यांना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास समजली. तोपर्यंत गोडाऊनमध्ये आगीचा भडका उडाला होता. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जुन्नर नगरपालिकेचा अग्निशमक बंब घटनास्थळी आला, तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. ही आग विझविण्याचे काम सकाळी नऊ वाजेपर्यंत चालले होते.
ही घटना आकस्मित जळीत म्हणून दाखल करण्यात आली आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. पोलीस स्टेशनच्या वतीने बीट अंमलदार मोहरे व तलाठी संतोष जोशी यांनी पंचनामा केला आहे. वीज पारेषण कंपनीचा अहवाल मागवण्यात येईल. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक ताटे यांनी दिली.
"कोरोना काळात दोन वर्षे अतिशय अडचणीत गेले होते. त्यानंतर सहा महिन्यापूर्वी व्यवसायाने पुन्हा नव्याने उभारी घेतली होती. ५० लाख रुपये खर्च करून डेकोरेशनचा नवीन सेट तयार केला होता. खूप कष्टातुन हा व्यवसाय उभा केला होता; मात्र या आगीने सर्व साहित्य जळून बेचिराख झाले आहे. आता पुन्हा नव्याने व्यवसाय उभा करणे अशक्य बनले आहे.- विक्रम भोर (विक्रम मंडप डेकोरेटरचे मालक)''