पुणे : भंडारा येथील जिल्हा रूग्णालयातील आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, पुणे महापालिकेने तातडीने आपल्या सर्व रूग्णालयांचे पुन्हा एकदा फायर आॅडिट करण्याचे आदेश दिले होते़ यामध्ये किरकोळ दुरूस्ती वगळता सर्व यंत्रणा व्यवस्थित कार्यरत असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या अग्निशामक विभागाने आरोग्य विभागास कळविले आहे़
पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ़ अंजली साबणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा येथील दुर्घटनेनंतर तातडीने महापालिकेच्या सर्व रूग्णालयांचे फायर आॅडिट करण्याचे आदेश दिले़ यात प्राधान्याने नवजात शिशू अतिदक्षता विभाग असलेल्या कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय येरवडा आणि सोनवणे रूग्णालयांचे आॅडिट करण्यास सांगण्यात आले होते़ यानुसार अग्निशामक विभागाने रविवारी या तीन रूग्णालयांची पाहणी केली असता, किरकोळ दुरूस्ती व्यतिरिक्त अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती अग्निशमन विभाग प्रमुख प्रशांत रणपिसे दिली़ तर येत्या दोन दिवसात महापालिकेच्या सर्व रूग्णालयांचे फायर आॅडिट पूर्ण करण्यात येणार आहे़
--------------------------------