बारामती : बारामती एमआयडीसीत एका स्क्रॅप मटेरीअलच्या गोडावूनला आग लागल्याची घटना सोमवारी(दि २१)दुपारी घडली. अचानक लागलेल्या या आगीने काही वेळातच राैद्ररुप धारण केले. त्यामुळे आग धुमसत असल्याचे चित्र हाेते. आगीची तीव्रता मोठी असल्याने सर्वत्र धुराचे साम्राज्य निर्माण झाले हाेते. भडकलेल्या आगीचे लोट पाहून अनेकांच्या काळजात धडकी भरली.
एमआयडीसीतील अग्नीशामक दलाच्या वाहनांनी तातडीने पोहचत आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरुच ठेवले होते. मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्याने आग धुमसतच होती. आगीचे कारण समजू शकलेले नाही. तसेच या आगीत कोणतीही जीवीतहानी झालेली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मात्र, स्क्रॅप मटेरीलचे मोठ्या प्रमाणात जळाल्याने लाखों रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. आग विझवण्यात अग्निशमन दलाला आता यश आले आहे. एमआयडीसीतील भारत फोर्ज कंपनीच्या पाठीमागील बाजुस हे गोडावून आहे.