मंचर (पुणे) : शहरातील गजबजलेल्या लक्ष्मी रस्ता येथील हरि ओम कॉम्प्लेक्स येथील स्वागत होम डेकोर या कपड्यांच्या दुकानाला रात्री भीषण आग लागून लाखो रुपयांचा माल आणि फर्निचर जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास स्वागत होम डेकोर या बंद असलेल्या दुकानाला आग लागली. दुकानाच्या शटरमधून धूर येऊन आवाज आल्याने सर्वप्रथम नगरपंचायत पटांगण या ठिकाणी दहीहंडीचा सराव करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली. कार्यकर्ते सराव सोडून त्या दिशेने पळत निघाले असता, काही नागरिक आग आग म्हणून ओरडताना दिसले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता लगेच त्या जळत असलेल्या दुकानाजवळ जाऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू लागले. जवळच असलेल्या टाकीतून पाणी काढून जिवाची पर्वा न करता दुकानाचे गरम झालेले शटर उचकटून आत प्रवेश केला. सर्व माल जळत असताना सुमारे ३० ते ४० कार्यकर्त्यांनी तो माल विझवला. बादलीने पाणी टाकत सगळी आग नियंत्रणात आणली. तेव्हा सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. यात काही कार्यकर्त्यांना किरकोळ जखमा झाल्या असून ते आता ठीक आहेत. बजरंग दलाच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान, यासंदर्भात गौरव चंद्रकांत रोडे यांनी मंचर पोलिसात माहिती दिली असून, आगीत नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलिस कर्मचारी राजेंद्र हिले यांनी पंचनामा केला आहे.
दरम्यान, मंचर ग्रामपंचायत आता नगरपंचायत झाली असून गावची स्वतःची अग्निशामक यंत्रणा असावी, अशी मागणी यावेळी बजरंग दलाने केली आहे. आग विझवण्यात विशाल थोरात, सागर हरिहर, निशांत गवारी, हेमंत चासकर, भूषण बाणखेले, चैतन्य महाजन, प्रणव पिंगळे, ओमकार निघोट, अश्विन बढे, प्रतीक निघोट, अथर्व बाणखेले, संदेश बाणखेले, अथर्व डोंगरे, चिन्मय महाजन तसेच गुरू कलेक्शनचे अमित बाणखेले, पूना बेकरीचे शेखर चौधरी, गौरव जेन्टस शाॅपीचे सोन्या गुजर, मधु भंडारचे संदीप संचेती अग्रभागी होते.