पुणे : बोपोडी येथील छाजेड पेट्रोल पंपाजवळील एका लाकडाच्या वखारीला पहाटे ५ वाजता भीषण आग लागली असून त्यात संपूर्ण वखार जळून खाक झाली आहे. वखारीत लाकडाच्या फळ्या एकावर एक रचून ठेवल्या असल्याने त्यावर पाणी मारुन आग विझवली तरी काही वेळाने खालच्या फळ्यामध्ये आग धुमसत असल्याने ती पुन्हा पेट घेत आहे. त्यामुळे आता संपूर्ण वखारीतील लाकडे जे सीबीच्या सहाय्याने बाजूला करुन आग विझविण्याचे काम सुरु असून ते आणखी काही तास चालण्याची शक्यता आहे.
वखारीच्या स्लॅबवर लाकडाच्या फळ्या ठेवल्या आहेत. त्यांचे वजन व त्यावर पाणी मारल्याने त्याचे वजन वाढल्याने स्लॅब वाकला आहे. वखारीमध्ये सर्वत्र फळ्या, वेगवेगळ्या प्रकारचे बांबु असल्याने आग चांगलीच भडकली होती. सतत पाणी मारुन अग्निशामक दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. बांबु बाहेर काढून आग विझविली. मात्र, फळ्या एकावर एक रचून ठेवल्याने त्याची आग पूर्णपणे विझली जात नव्हती. शेवटी जेसीबीच्या सहाय्याने भिंत फोडली व त्यामुळे जागा मिळल्यावर या फळ्या बाजूला करण्याचे काम सुरु केले आहे. जवळपास तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग विझली असून आता तेथील जागा थंड करण्याचे काम सुरु आहे. आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही.
लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी पुणे शहरात १७ किरकोळ आगी लागल्या होत्या.