पुणे : गुरुवारी रात्री उशिरा वानवडीतील शिवरकर गार्डनच्या मागे शिवरकर चाळ येथे घराला आग लागली होती. याची माहिती अग्निशमन दलाला समजल्यानंतर अग्निशमनची वाहने घटनास्थळी रवाना झाली होती. त्यानंतर जवानांना आग अटोक्यात आणण्यात यश आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमनची वाहने घटनास्थळी पोहोचताच तिथे काही घरांना आग लागल्याचे दिसून आले. जवानांनी पाण्याचा मारा चोहोबाजूंनी सुरू करत घरामधे कोणी अडकले नसल्याची खात्री केली. आगीची तीव्रता पाहून घटनास्थळी असणाऱ्या अग्निशमन अधिकाऱ्यांच्या मागणीवरुन दलाकडून अतिरिक्त मदत रवाना करण्यात आली होती.
घटनास्थळी पुणे अग्निशमन दलाच्या चार फारयगाड्या व दोन वॉटर टँकर आणि पुणे कॅन्टोमेंट विभागाची एक फायरगाडी दाखल झाली होती. या जवानांनी आग विझवण्याची कार्यवाही केली. दलाकडून सुमारे २० मिनिटात आग आटोक्यात आणत पुढील धोका टाळण्यात आला. तसेच आग पुर्णपणे राञी साडे बारा वाजता विझवण्यात यश आले.
सुदैवाने या आगीमधे कोणीही जखमी किंवा जिवितहानी झाली नाही. याठिकाणी आगीमधे एक घरगुती सिलेंडर फुटला असून एकुण ०४ घरे पूर्ण जळाली तर इतर ३ घरांना झळ लागली आहे. आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज असून या ठिकाणी गृहपयोगी सर्व वस्तू जळाल्याने कुटूंबाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी महावितरण विभाग व पोलिस दल दाखल झाले होते.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी समीर शेख, कैलास शिंदे वाहनचालक समीर तडवी, दिपक कचरे, संतोष गायकवाड तसेच जवान निलेश लोणकर, राहुल नलावडे, विशाल यादव, प्रकाश शेलार, जितेंद्र कुंभार, संदिप पवार यांनी सहभाग घेतला.