पुणे : शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे आगीचा सामना करणाऱ्या जवानांचीच संख्या कमी आहे. मंजूर पदांच्या निम्मेच जवान या विभागाकडे असून त्यांच्याच जिवावर शहरातील आगीसारख्या घटनांचा सामना केला जात आहे.अग्निशमन विभाग महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांमध्ये येतो. आगीसारख्या दुर्घटनांबरोबरच अनेक आपत्तींच्या काळात याच विभागाचे जवान प्राणहानी थांबवतात, वित्तहानीपासून वाचवतात. त्यांच्याकडे मंजूर असलेल्या ९२१ पदांपैकी ४४९ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. तब्बल ४७२ पदे रिक्त आहेत. वारंवार मागणी केल्यानंतरही प्रशासनाकडून या भरतीकडे दुर्लक्ष केले जात आहे.शहराची लोकसंख्या व क्षेत्रफळ यानुसार किती अग्निशमन केंद्र असावीत, हे निश्चित केलेले आहे. तसेच प्रत्येक केंद्रात किती कर्मचारी असावेत, हेही निश्चित केलेले आहे. हे दोन्ही निकष महापालिकेत पाळले गेलेले नाहीत. केंद्रांची संख्याही कमी आहे व आहे त्या केंद्रात कर्मचारी संख्याही कमी आहे. आग विझविणारी वाहने चालवण्यासाठीही या विभागाकडे चालक नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या मोटार वाहन विभागाकडून कंत्राटी सेवेतील ३१ चालक या विभागाला देण्यात आले आहेत. नगरसेवक अॅड. गफूर पठाण यांनी प्रशासनाला याबाबत माहिती विचारली होती. त्यांना दिलेल्या लेखी उत्तरात प्रशासनानेच त्यांना ही माहिती दिली आहे.
अग्निशमन दलाकडे नाहीत जवान; तब्बल ४७२ पदे रिक्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 3:49 AM