पुणे : पुणे शहर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत नदीत उडी घेतलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचविले आहेत. त्या व्यक्तीने नदीत उडी का घेतली याचे कारण अस्पष्ट असून अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले आहे.
पुणे जिल्ह्यात घाट माथ्यावर माेठ्याप्रमाणावर पाऊस हाेत असल्याने जिल्ह्यातील धरणे शंभर टक्के भरली आहेत. खडकवासला धरण भरल्याने त्यातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास एका 45 वर्षीय व्यक्तीने म्हात्रे पुलावरुन पाण्यात उडी मारली. याबाबत नागरिकांनी विविध घाटांवर गणेश विसर्जनानिमित्त तैनात असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. गरवारे विसर्जन घाटावर असलेल्या अग्निशमन दलाचे जवान जितेंद्र कुंभार यांनी तातडीने पाण्याकडे धाव घेतली. तेव्हा ती व्यक्ती म्हात्रे पुलाकडून एस. एम. जाेशी पुलाच्या दिशेने पाेहण्याचा प्रयत्न करत येताना दिसली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कुंभार यांनी प्रकाश काची आणि अमाेल गायकवाड या दाेघा जीवरक्षकांच्या मदतीने पाणाच्या मधाेमध त्या व्यक्तीच्या दिशेने दाेर फेकला. दाेर जवळ येताच त्या व्यक्तीने ताे पकडला. जवानांनी दाेर ओढून त्या व्यक्तीला बाहेर काढलेे.
त्या व्यक्तीला नदीत उडी मारण्याचे कारण विचारले असता ताे काहीही बाेलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे जाणवले. जवानांनी त्याच्या नातेवाईकांना बाेलावून घेत त्या व्यक्तीला त्यांच्याकडे सुपूर्त केले.