पुणे : मध्यरात्रीची 3 वाजताची वेळ. अग्निशमन दलाला अाग लागल्याचा फाेन येताे. अवघ्या दाेनच मिनिटात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पाेहचतात. चिंचाेळ्या गल्ल्यांमुळे फायर गाडी अात जाऊ शकत नाही. जवान शर्थिचे प्रयत्न करुन अाग विझविण्याचा प्रयत्न करतात. आणि काेणालाही इजा हाेऊ न देता अवघ्या 15 मिनिटात अागीवर नियंत्रण मिळवतात. ही घटना अाहे काल मध्यरात्री पुण्यातील पाटील इस्टेट झाेपडपट्टी भागात घडलेली. साेमवारी रात्री 3 च्या सुमारास पाटील इस्टेट येथील झाेपडपट्टीतील एका घराला अाग लागली. 10 बाय 12 च्या खाेलीला लाकडी बांधकाम असल्याने अागीने राैद्र रुप धारण केले हाेते. लांबून अागीचे भले माेठे लाेट नजरेस पडत हाेते. संपूर्ण शहर गाढ झाेपेत असताना अग्निशमन दलाचे जवान अाग विझवत हाेते. पाटील इस्टेट येथील झाेपडपट्टीत चिंचाेळ्या गल्ल्या अाहेत. त्यातून एकावेळी एकच माणूस जाईल इतकीच जागा अाहे. अाग लागलेले घर हे एका गल्लीच्या बरेच अात हाेते. तिथपर्यंत फायर गाडी जाने अशक्य हाेते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत माेठ्या पाईपच्या माध्यमातून पाण्याचा मारा सुरु केला. घराला लागलेल्या अागीमुळे घराच्या बाजूच्या व समाेरच्या घराला देखील अागीची झळ पाेहचली. अवघ्या 15 मिनिटाच्या अात अागीवर नियंत्रण मिळवण्यात अाले. दयाराम राजगुरु अग्निशमन केंद्र तसेच कसबा अग्निशमन केंद्राच्या जवानांच्या मदतीने ही अाग विझवण्यात अाली. अागीचे राैद्र रुप पाहता खबरदारी म्हणून अाणखी दाेन फायर गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात अाल्या हाेत्या. या अागीत कुठलिही जीवित हानी झाली नाही.
याबाबत बाेलताना दयाराम राजगुरु अग्निशमन केंद्राचे स्टेशन अाॅफिसर विजय भिलारे म्हणाले, रात्री 3 वाजून 8 मिनिटांनी अाग लागल्याचा फाेन अाला. अवघ्या दाेनच मिनिटात अाम्ही घटनास्थळी दाखल झालाे. अागीचे राैद्र रुप पाहून अाम्ही जादा कुमक मागवून घेतली. या भागातील चिंचाेळ्या गल्ल्यांमुळे अाग विझविण्यास काहीशी अडचण अाली. परंतु अामच्या जवानांनी जिवाची बाजी लावून अागीवर नियंत्रण मिळवले. या ठिकाणी घराला लागून घर असल्याने अाग माेठ्याप्रमाणावर पसरण्याचा धाेका हाेता. परंतु अामच्या जवानांच्या तत्परतेमुळे माेठा अनर्थ टळला.
ही कामगिरी विजय भिलारे यांच्याबराेबर विकास शितापकर, कमलेश चाैधरी, अरुण गायकर, जयेश गाताडे, अरगडे, करिम पठाण, विष्णु जाधव अादी जवाननांनी पार पाडली.